नाशिककरांसाठी अवघे ५३१४ दलघफू पाणी आरक्षण

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठवाड्यासाठी नाशिकच्या गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून २.६ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आल्यानंतर आता जलसंपदा विभागाने नाशिककरांच्या पाणी आरक्षणात कपात केली आहे. नाशिकसाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाणीआरक्षणाची मागणी महापालिकेने केली असताना नाशिककरांच्या वाट्याला जेमतेम ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यासंदर्भातील जलसंपदा विभागाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा उचलण्याची परवानगी महापालिकेला देण्यात आली असून हे पाणी पंपीग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी धरणात चर खोदण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

पावसाने ओढ दिल्याने मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा आधार घेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही नाशिक व अहमदनगरला दिलासा मिळू शकला नाही. या दोन्ही जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वास्तविक पाहता १५ आॉक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समुहातून ४४००, मुकणे धरणातून १६०० तर दारणा धरणातून १०० असे एकुण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. परंतू जायकवाडीला पाणी सोडल्याने पाणी आरक्षणात कपात करत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली. जलसंपदाने महापालिकेच्या ६१०० पाणी आरक्षण मागणीवर आक्षेप घेत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले. मागील वर्षी शहरासाठी ५७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाल्याने किमान तेवढेच पाणी आरक्षण तरी नाशिकसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. मात्र ती मागणी देखील जलसंपदा विभागाने फेटाळली आहे.

..तरच पाणीसंकट दूर होऊ शकते.

जायकवाडीतील २६ टीएमसी मृत साठ्यापैकी काही टीएमसी मृत साठा वापरण्याची परवानगी जलसंपदाने दिली असती तरी नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ आली नसती. परंतू जलसंपदा विभागाने तसे न करता गंगापूर धरणातील जेमतेम ६०० दशलक्ष घनफूट मृतसाठ्याकडे लक्ष पुरविले. हा मृतसाठा उचलण्यासाठी महापालिकेकडे व्यवस्था नाही. महापालिकेचे पंपीग स्टेशनमधील जॅकवेल व जलसाठ्या दरम्यान मोठा खडक आहे. पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी हा खडक फोडून चर खोदावी लागणार आहे. चर खोदण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

असे असेल आरक्षण

– गंगापूर धरण समुह- ३८०७ दशलक्ष घनफुट.

– मुकणे धरण -१४०७ दशलक्ष घनफुट.

– दारणा- १०० दशलक्ष घनफूट.

The post नाशिककरांसाठी अवघे ५३१४ दलघफू पाणी आरक्षण appeared first on पुढारी.