ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

जिल्हा परिषद नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मिनी मंत्रालयात कर्मचाऱ्यांसाठी एकीकडे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्हाभरातून काही ना काही कामे घेऊन आलेले नागरिक या बैठका संपण्याची वाट बघत दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवारात खेटा मारत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत १७ व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. जर विभागप्रमुख आणि कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये मश्गुल झाले तर जिल्हा परिषदेकडून अखर्चित १५५ कोटींचा निधी कसा खर्च होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये एकोपा रहावा, खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम भरविण्याचे निर्देश दिले होते. यंदाही जिल्हा स्तरावरील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तसेच जि. प. फेस्टिव्हल स्व.मीनाताई ठाकरे विभागीय संकुल येथील मैदानावर २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार बैठकांचे सत्र सुरू आहे.

या स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी (दि. १३) बैठक झाली. यावेळी सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये संघ निवडीबाबत चर्चा झाली. मात्र, या स्पर्धांमध्ये कर्मचारीवर्गात निरूत्साह दिसून आला. त्यावरून थेट संघ तयार करण्याचे आदेश काढण्यात आले.

बजेट आणि निधी खर्चाची लगबग
जिल्हा परिषदेचा आतापर्यंत ७२ टक्के निधी खर्च झाला आहे. अद्यापही २८ टक्के निधी (विविध विभागांचा १५५ कोटी) खर्च झालेला नाही. या निधी खर्चासाठी लेखा व वित्त विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पदेखील सादर करायचा आहे. त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात जाहीर होण्याची शक्यता आहे. सुट्टया वगळता अवघे १४ दिवस बाकी आहे.

हेही वाचा:

The post ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन appeared first on पुढारी.