नाशिक : ‘आशी’ विसावली परदेशी पालकांच्या कुशीत

नाशिक जिल्हाधिकारी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जगात एकीकडे ‘व्हॅलेंटाइन डे’चा उत्साह असतानाच आधाराश्रमातील ‘आशी’ या चिमुकलीला परदेशी दाम्पत्याच्या रूपाने आई-वडिलांच्या मायेची ऊब लाभली. केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधनाच्या (सीएआरए) मार्गदर्शक सूचनांनुसार यूएसए येथील जमशेदी दाम्पत्याने आशीला दत्तक घेतले. मंगळवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आशीला पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुनर्वसनाचे कार्य करण्यात येते. त्या अंतर्गत केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन (सीएआरए) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आशीला यूएसए येथील डेविन जमशेदी व लायनी जमशेदी या दाम्पत्याने दत्तक घेतले. जमशेदी दाम्पत्यास यापूर्वी मुलगा व मुलगी अशी जुळी बालके आहेत. आशी हिला जन्मत: एकच किडनी असून तिची जीभ टाळूला चिकटलेली असल्याने त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. दत्तक नियमावलीनुसार असे बालक विशेष काळजी घोषित करून ते परदेशी पालकांना दत्तक म्हणून दिले जाते. त्यानुसार जमशेदी दाम्पत्याला जुळी बालके असतानाही त्यांनी विशेष काळजीचे बालक दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मागील ८ महिन्यांपासून ही प्रक्रिया सूरू होती.

कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आशीला जमशेदी दाम्पत्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी भूषण काळे आदी उपस्थित हाेते.

पहिलीच प्रक्रिया

आशी हिच्या रूपाने नवीन दत्तक प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. तसेच आजपर्यंत देशांतर्गत या स्वरूपाचे ४ आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारित करण्यात आले आहेत, अशी माहिती राहुल जाधव यांनी दिली.

The post नाशिक : 'आशी' विसावली परदेशी पालकांच्या कुशीत appeared first on पुढारी.