नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मागील आठवड्यात शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याने दि. २७ मार्च रोजी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते. निवेदन देताना संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. त्याच प्रकरणात शेतकऱ्यांसाठी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी (दि. 3) बाजार समितीच्या सचिवांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात नाशिकसह सिन्नर, कळवण, दिंडोरी शहरालगतच्या खेड्यापाड्यांतून शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी आणतात. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी, समशाद फारुकी हे जवळपास १७९ शेतकऱ्यांचा १ कोटी ८० लाख रुपयांचा माल घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांची सोमवारी (दि.३) दुपारी भेट घेतली. ज्या व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांचे पैसे घेणे बाकी आहे, त्या व्यापाऱ्याचे बाजार समिती आवारात असलेले गाळे विक्री करत आलेल्या पैशांतून समान हिस्से करत शेतकऱ्यांना वाटप करावे, असे कोकाटे यांनी सांगितले. तसेच आमदार कोकाटे यांनी बाजार समिती कार्यालय येथूनच पोलिस आयुक्त यांना फोनवरून घडलेल्या प्रकरणाबाबत हकीकत सांगितली. त्यावर पोलिस आयुक्त यांनीदेखील घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ पोलिस आयुक्तालयात पाठविण्याबाबत सांगितले असून, उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आमदारांना दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ appeared first on पुढारी.