नाशिक : नव्या वर्षापासून सिटीलिंककडून सात टक्के भाडेवाढ होणार लागू

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिटीलिंक शहर बसेसची प्रवासी भाडे दरात सात टक्के वाढीचा प्रस्ताव नाशिक महानगर परिवहन महामंडळाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केला असून, प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर नव्या वर्षापासून प्रवासी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.

महापालिकेची शहर बससेवा जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत बससेवा तोट्यात आहे. असे असले तरी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हे या बससेवा सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे. सिटीलिंकच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा नियम आहे. जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील पाच टक्के प्रवासी भाडे दरवाढ करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षभरात डिझेल आणि सीएनजीच्या दरातील वाढीमुळे सिटीलिंकचा तोटा वाढल्याने यंदा पाच टक्क्यांऐवजी सात टक्के भाडेवाढीचा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भातील प्रस्तावाला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय परस्पर भाडेवाढ लागू करता येत नसल्याने महानगर परिवहन महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव प्राधिकरणाला सादर केला आहे.

पासेसचेही दर वाढणार

प्रवाशी भाडे वाढीबरोबरच सिटीलिंकडून पासेसच्या दरातही वाढ करण्यात येणार आहे. बऱ्याचदा सुट्या पैशांच्या अडचणी येत असल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत असतात. त्यामुळे हा वाद टळावा या उद्देशाने तिकीटाचे दर आता राऊंडफिगरमध्ये आकारले जाणार आहेत. मात्र यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नव्या वर्षापासून सिटीलिंककडून सात टक्के भाडेवाढ होणार लागू appeared first on पुढारी.