नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार? 

गिरणा धरण www.pudhari.news
नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील सध्यास्थितीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यास विशेष प्रयत्न केले जात आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरासाठी सुरु असलेली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी योजना, धर्मवीर आनंद दिघे ७८ खेडी पाणी पूरवठा योजनांचे काम प्रगतीपथावर आहे.  नांदगाव शहरासाठी गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवाठा योजना देखील मंजूर झालेली आहे. त्यामुळे नांदगाव, मनमाड शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
परंतु पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी एखाद्या सिंचन प्रकल्पाची देखील निकडीची आवश्यकता नांदगाव तालुक्याला भासत आहे. शेतीसाठी पाणी हा महत्वाचा प्रश्न आहे. नांदगाव तालुक्यात दहेगांव धरण, माणिकपुंज धरण, नागासाग्या धरण, गिरणा धरण अशी छोटी मोठी धरणे आहेत. यामध्ये दहेगाव धरण नांदगाव शहरासाठी राखीव आहे. परंतु दहेगाव धरण हे नियमीतपणे भरत नसल्याने माणिकपुंज धरणातून देखील नांदगाव शहरासाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. तसेच  माणिकपुंज, कासारी, जळगाव बु., जळगाव खु., पोही, कसाबखेडा, चांदोरा, न्यायडोंगरीसह चाळीसगाव तालुक्यातील गावांना येथील धरणाचा सिंचनासाठी उपयोग होत असतो. नाग्या-साक्या आणि गिरणा धरणाचा तालुक्यातील काही ठराविक गावांनाच सिंचनासाठी उपयोग होतो आहे.
ही धरणे नांदगाव तालुक्यातील असली तरी या धरणातील पाण्याचा फायदा नांदगाव करांपेक्षा इतर तालुक्यांना जास्त होतो. धरणांशेजारील काही गावे सोडता तालुक्यातील बाकी गांवाचा सिंचनाचा प्रश्न अद्यापही जैसेथे आहे. तालुक्यात शेतकऱ्यांकडून मका, कांदा, कपाशी, बाजरी, गहू या सारखी प्रमुख पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र एक लाख दहा हजार हेक्टर आहे. त्यात बागायती क्षेत्र दहा ते अकरा हजार हेक्टर, कोरडवाहू क्षेत्र ५१००० हेक्टर असून उन्हाळी क्षेत्र मात्र ५७०० हेक्टर ईतकेच आहे. शेतीसाठी सिंचन प्रकल्प नसल्याने अर्ध्या रब्बी हंगामातच शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे तालुक्यात उन्हाळ बागायक्षेत्र फार कमी आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीमध्ये उणीव भासताना दिसते. तालुक्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळाल्यास एखादा सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यास तालुका सुजलाम सुफलाम होवू शकतो. बाजारपेठमध्ये याचा फायदा होऊन संपूर्ण तालुक्याची परिस्थिती मजबूत होऊ शकते.
गेल्या काही वर्षांपूर्वी नारपार (दमनगंगा) प्रकल्प योजनेचे पाणी नांदगावकरांसाठी यावे यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षांनी एकत्रीत येत यासाठी पाठपुरावा देखील केला होता. परंतु या प्रकल्पाच्या डिपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेशाबाबत साशंकता असल्याने, नांदगावकरांच्या अपेक्षांवर पाणी पडते की काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर मागील काही वर्षापासून सातत्याने तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्याने पिण्याचा प्रश्न गंभीर वाटत नसला तरी नांदगाव तालुक्यात मोठे जलसाठे नसल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले तर लवकरच पाणी टंचाई जाणवते. तसेच भविष्याच्या दृष्टीने तालुक्यात मोठ्या सिंचन प्रकल्पाची गरज आहे. तरी भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागावा आशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुक्यातील धरणे… 
माणिकपुंज धरण, नागा- साग्या धरण, ,दहेगाव धरण, गिरणा धरण
* तालुक्यातील शेती पिक क्षेत्र
* तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र एक लाख दहा हजार हेक्टर.
* बागायत क्षेत्र दहा ते अकरा हजार हेक्टर.
* कोरडवाहू क्षेत्र ५१००० हेक्टर
* उन्हाळी क्षेत्र ५८०० हेक्टर

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार?  appeared first on पुढारी.