नाशिक : निर्विघ्न गणेशोत्सवासाठी राज्यातील पोलिस ‘अलर्ट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केल्यानंतर गृहविभाग सतर्क झाला आहे. दीड महिन्यापूर्वी राज्यातील सत्तांतरानंतर सणांवरही राजकीय वर्चस्ववादाचा प्रभाव दिसत आहे. त्याचप्रमाणे रायगड येथे बेवारस बोटीत शस्त्रसाठा आढळून आल्याने राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयासह परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाचे आगमन हाेत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. दरम्यान, राज्यातील सत्तांतर, समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोटीत आढळून आलेला शस्त्रसाठा, मुंबईत दह‌शतवादी हल्ल्यासंदर्भातील मेसेज आणि राज्यातील राजकीय चढाओढ यामुळे पोलिस यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाने राज्यातील सात परिक्षेत्रांसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचा अधिकारी निरीक्षक म्हणून नेमला आहे. त्यानुसार नाशिकचे तत्कालीन पोलिस आयुक्त व वाहतूकचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे नाशिक परिक्षेत्रची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरंगल यांनी शनिवारी (दि.२०) पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक, बी. जी. शेखर पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यात केंद्रीय व राज्य गुप्तचर यंत्रणेकडून राज्यात राजकीय, सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवल्याने त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सांगितले आहेे. दहशतवादी हल्ले रोखण्याची मोठी जबाबदारी असून, परिक्षेत्रनिहाय एकमेकांशी समन्वय ठेवण्यास सांगितले आहे. नियमबाह्य सणोत्सव साजरा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासोबतच, दंगल नियंत्रण, जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याचे आदेश आहेत. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर देण्यास सांगितले. सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासोबतच आक्षेपार्ह पोस्ट त्वरित डिलिट करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष शाखा, गुप्तवार्ता विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्यासोबत, व्हीआयपी सुरक्षेचे तंतोतंत नियोजन करण्यासोबतच पोलिसांच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्याकडेही लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तरुणाईकडे विशेष लक्ष! 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी निवडणुका व राजकीय घडामोडी नजरेसमोर ठेवून जास्तीत जास्त तरुणांवर पकड ठेवण्यासाठी राजकीय चढाओढ सुरू असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या सणात हे चित्र दिसून आले. त्यानंतर गणेशोत्सवातही ही शक्यता सर्वाधिक असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या गटात सहभागी करून घेण्यासाठी राजकीय पदाधिकारी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही पोलिस सतर्क झाले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : निर्विघ्न गणेशोत्सवासाठी राज्यातील पोलिस ‘अलर्ट’ appeared first on पुढारी.