नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार – दादा भुसे

दिंडोरी: पुढारी वृत्तसेवा : गारपिटीमुळे रब्बी पिके आणि द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने येत्या दोन ते तीन दिवसांत नुकसानग्रस्त शेतीचे आणि बागांचे पंचनामे केले जातील. त्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज (दि. १६) दुपारी दिले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दुपारी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी कुर्नोली, खडकसुकेना, जोपुळ चिंचखेड या भागाचा दौरा केला. मंत्री भुसे यांनी मोहाडी येथे द्राक्ष उत्पादक सुरेश कळमकर यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कुर्नोली व खडक सुकेना येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी तहसीलदार पंकज पवार, कृषी अधिकारी पाटील, गटविकास अधिकारी जगताप आदींसह सर्व अधिकारी, चेअरमन श्रीराम शेटे, माजी आमदार धनराज महाले, अनिल कदम, प्रवीण जाधव, संचालक शहाजी सोमवंशी, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, दिंडोरी तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकाचे 300 हेक्टर, भाजीपाला 250 हेक्टर, तर गुलाब शेतीचे सुमारे 70 हेक्टरवर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर बेदाणा उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार - दादा भुसे appeared first on पुढारी.