नाशिक : नोकरभरतीचा घाट, जुन्या ५११ पदांवर टाच

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘एखादा चमचमता रुमाल मुठीत घ्यायचा, मूठ उघडली तो गायब…’ वरवर हा प्रकार जादूचा वाटत असला तरी, ती हातचलाखी असते. अशीच काहीशी हातचलाखी महापालिका प्रशासनाने केल्याचे दिसून येत आहे. नव्या नोकरभरतीचा घाट घालताना विद्यमान आस्थापना परिशिष्टावरील तब्बल ५११ पदे गायब केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये बिगारी संवर्गातील सर्वाधिक ३६२ पदांचा समावेश आहे. महापालिकेच्या या अजब निर्णयामुळे उच्चशिक्षितांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असली तरी, निम्नस्तरीय शिक्षण असलेल्यांच्या नोकरीची संधी मात्र कायमस्वरूपी हिरावली जाणार आहे.

सध्या महापालिकेवर प्रशासकीय राजवट असून, याच काळात नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जोरदार तयारी मनपा प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र, हे करीत असताना जुनी पदे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अचंबित करणारा आहे. प्रशासनाने विविध विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार अग्निशमनच्या ३४८, तर वैद्यकीय-आरोग्यच्या ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. तसेच राज्यातील महापालिका, नगर परिषदांमधील ४० हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर नाशिक महापालिकेतील सुमारे २८०० रिक्त पदांच्या भरतीची लगीनघाई सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासकीय सेवा, लेखा व वित्त, लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, खतप्रकल्प, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रस्तावांना महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.

ही पदे केली रद्द

– बिगारी संवर्गातील ३६२

– खतप्रकल्पावरील विविध संवर्गातील ८४

– नाट्यगृह विभागातील रंगमंच सहायक ३

जलतरण तलावातील हेल्थ सेंटर कोच १

अभियांत्रिकी (स्थापत्य) विभागातील सर्व्हेअर ६,

अभियांत्रिकी (यांत्रिकी) विभागातील अ‍ॅटो इलेक्ट्रिशियन १,

– वेल्डर २, ऑइलमन ३, पंपचालक १, मोटर क्लिनर ६,

– बोअर अटेन्डेन्ट १६, फिल्टर प्लान्ट ऑपरेटर १,

– अभियांत्रिकी (विद्युत) विभागातील टेलिफोन ऑपरेटर २,

– झेरॉक्स ऑपरेटर १, लिफ्टमन ३,

– वैद्यकीय व आरोग्य विभागातील गंगापट्टेवाले ४,

– विभागीय स्वच्छता निरीक्षक १२, सांख्यिकी अधिकारी १

– ब्लॉक लेव्हल सुपरवायझर १, प्रशासकीय सेवा विभागातील बाइंडर १,

नव्याने मंजूर केलेली पदे
वॉचमनची ११६ पदे सुरक्षारक्षक पदांमध्ये समायोजित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर माळी संवर्गातील ६४ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत २४ कार्यरत असून, ४० पदे रिक्त आहेत. आणखी ६० नवीन पदांची शिफारस करण्यात आली आहे. बिगारी पदाऐवजी माळी संवर्गातील पदे नव्याने मंजूर करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. याशिवाय अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) विभागातील श्रेणी ३ संवर्गातील १२ पदे नव्याने निर्माण करण्याची, तर गंगापट्टेवाल्यांच्या दहा मंजूर पदांपैकी सहा पदे सफाई कामगार संवर्गात समायोजित करण्याची मागणी ठरावाद्वारे शासनाकडे करण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : नोकरभरतीचा घाट, जुन्या ५११ पदांवर टाच appeared first on पुढारी.