नाशिक : नोकरानेच मालकाला लावला 19 लाख रुपंयाचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नोकरांनी मालकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेत गंडा घातला आहे. दोघा नोकरांनी मालकांना सुमारे १८ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घालून ते परागंदा झाले आहेत. याप्रकरणी आडगाव व पंचवटी पोलिस ठाण्यात नोकरांविरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत हर्षल संजय गावंडे (२८, रा. औरंगाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कंपनीतील सेल्स मॅनेजर विजय काशीनाथ भरणे (३५, रा. ता. इंदापूर, जि. पुणे) याने १८ लाख १२ हजार ७९५ रुपयांचा गंडा घातला. हर्षल यांच्या कंपनीत खत व इतर शेती उत्पादने केली जातात. त्यांचे ग्राहक व डिलर्स जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील असल्याने त्यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये विजय भरणे यास कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी दिली. इंदापूर, बारामतीसह इतर ठिकाणच्या डिलर्सला माल पोहोचवून त्यांच्याकडून मालाचे पैसे गोळा करून कंपनीत भरण्याची जबाबदारी विजयकडे हाेती. सुरुवातीस विजयने त्याची जबाबदारी पार पाडत कंपनीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने दुकानात मालविक्रीसाठी ठेवण्यासाठी हर्षल यांच्याकडून ८ लाख ४८ हजार १५० रुपयांचा माल घेतला, तसेच वेगवेगळ्या डिलर्सला दिलेल्या मालाचे ९ लाख ६४ हजार ६४५ रुपये घेऊन ते कंपनीत जमा न करता विजय पसार झाला. त्यामुळे विजयने पैशांचा अपहार करून हर्षल यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत शिवाजी रमेश खेडकर (३३, रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पेट्रोलपंपावरील कर्मचारी ५० हजार ६१० रुपयांची रोकड घेऊन पसार झाला. खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रामवाडी येथील गोदावरी पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पंपावरील कर्मचारी ईश्वर राजेंद्र गुरगुडे (रा. रामवाडी) हा १३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी घरी जाऊन येतो असे सांगून गेला. त्यावेळी त्याने त्याच्यासोबत पेट्रोल विक्रीतून आलेली रोकडही सोबत नेली होती. त्यानंतर तो पंपावर परत आलाच नाही. त्यामुळे इंधनविक्रीतून आलेल्या पैशांचा अपहार केल्याचा ठपका गुरगुडेवर ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : नोकरानेच मालकाला लावला 19 लाख रुपंयाचा चुना appeared first on पुढारी.