नाशिक : पंचनामे होईपर्यंत सुट्या रद्द – आमदार दिलीप बोरसे

SATANA www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी येत्या चार दिवसांत तालुक्यातील अवकाळी व गारपीटग्रस्त शेती पिकांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करावेत. शेतकर्‍यांवर अतिशय दुर्दैवी नैसर्गिक घाला आला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने व जबाबदारीने पंचनामे करून घ्यावेत. त्यासाठी आगामी सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. कुणीही शेतकर्‍यांची अडवणूक केल्यास प्रसंगी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार दिलीप बोरसे यांनी दिला.

बुधवारी (दि.12) येथील प्रांत कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन पंचनाम्यांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर आमदार बोरसे बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांसह महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीने सर्वच शेतीपिकांची अपरिमित हानी झाली आहे. काही ठिकाणी शेतातच कांदा आतून कुजला आहे, ही बाब पंचनामे करताना अधिकारी, कर्मचार्‍यांनी विशेष ध्यानी ठेवावे. कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही आमदार बोरसे यांनी केल्या. डाळिंब, द्राक्ष पिकांची हानी अपरिमित आहे. डाळिंबाची आंबे बहारची फळे गळून पडली असून, काडीही नाश पावली आहे. म्हणून आगामी दोन वर्षे फळपिके घेता येणार नाहीत. परिणामी, नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने काळजीपूर्वक व गांभीर्याने पंचनामे करावेत. गावोगावी थेट शेत शिवारात जाऊन पंचनामे करून घेताना बाधित शेतकरी टळू नयेत, यासाठी स्वतःहून पुढाकार घेत संबंधितांपर्यंत माहिती पोहोच करावी. त्यासाठी आगामी सुट्यादेखील रद्द केल्या असून, याकामी कर्तव्यात कसूर केल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल, असा गर्भित इशाराही आमदार बोरसे यांनी दिला. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पप्पू बच्छाव, बाजार समिती सभापती नरेंद्र अहिरे, संचालक पंकज ठाकरे, बिंदूशेठ शर्मा, ब्राह्मणगावचे सरपंच किरण अहिरे आदींसह लोकप्रतिनिधी व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

बांधावर कुणी आले नाही तर तक्रार करा
या सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घेत प्रांताधिकारी काकडे यांनी संबंधितांना तत्काळ निर्देश दिले. प्रत्येक गावासाठी एका कर्मचार्‍याची नियुक्ती झाली आहे, असे सांगून ज्या शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत कोणीही पोहोचले नाही असे आढळल्यास त्यांनी स्वतः थेट प्रांत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : पंचनामे होईपर्यंत सुट्या रद्द - आमदार दिलीप बोरसे appeared first on पुढारी.