नाशिक : पंजाब स्फोटक प्रकरणातील आरोपीस शिर्डीमध्ये अटक; महाराष्ट्रात हाय अलर्ट

पंजाब स्फोटक प्रकरण www.pudhari.news

नाशिक (शिर्डी)  : पुढारी वृत्तसेवा
पंजाबमधील पोलिस अधिकार्‍याच्या गाडीखाली स्फोटके ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न करून तेथून महाराष्ट्रात फरार झालेल्या गुन्हेगाराच्या पंजाब व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शनिवारी (दि.20) शिर्डीत ही कारवाई केल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी दिली.

पंजाब राज्यातील रणजित रेव्हेन्यू पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी दिलबाग सिंग यांना जीवे मारण्याच्या हेतूने आरोपी राजेंदर ऊर्फ बाऊ राजकुमार बेदी (वय 28), त्याचे साथीदार हरपालसिंग व फत्यादीपसिंग (रा. जि. तरंगातरंग, अमृतसर) यांनी त्यांचे वाहन स्फोटक पदार्थाने उडवून देण्यासाठी आयईडी ठेवले होते. मंगळवारी (दि. 16) हा कटाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पंजाब पोलिसांनी देश विघातक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पंजाब दहशतवादविरोधी पथक या आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, या घटनेनंतर राजेंदर ऊर्फ बाऊ राजकुमार बेदी पंजाबमधून फरार झाला. तो मालदीवला जाणार होता. मात्र त्याच्याकडे कोरोना अहवाल नसल्याने त्याला विमानाचे तिकीट मिळाले नाही. यानंतर तो नांदेड येथे जाण्यासाठी रेल्वेत बसला. मात्र ती रेल्वे मनमाडपर्यंतच असल्याचे समजल्यानंतर त्याने मनमाडमध्ये एक दिवस लॉजमध्ये मुक्काम केला. नंतर दुसर्‍या दिवशी तो शिर्डीत आला. दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी तुषार दोषी व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आरोपी राजेंदर ऊर्फ बाऊ राजकुमार बेदी शिर्डीत असल्याची माहिती शुक्रवारी (दि. 19) मिळाली. पंजाब पोलिस व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकासह शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव व पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीत सापळा रचण्यात आला. श्रीसाई मंदिराकडे जाणार्‍या प्रवेशद्वार क्रमांक 2 च्या मुख्य रस्त्यावर हॉटेल गंगा कॉन्टिनेंटलमध्ये बेदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानुसार राजेंदर याला हॉटेलमधील खोली क्र.312 मधून अटक करण्यात आली. अटक करताच राजेंदर याला पंजाब पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : पंजाब स्फोटक प्रकरणातील आरोपीस शिर्डीमध्ये अटक; महाराष्ट्रात हाय अलर्ट appeared first on पुढारी.