नाशिक : पर्यावरणपूरक सायकलवारीसाठी तीनशे सायकलिस्टचे आज प्रस्थान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 10 वर्षांपासून नाशिक-पंढरपूर सायकलवारी काढली जाते. या वारीत नागरिक मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. दोन दिवस सायकल चालवत पंढरीत पांडुरंग चरणी लीन होतात. यंदा भक्तिरसमय पर्यावरणपूरक ब्रीद असलेल्या वारीचे शुक्रवारी (दि.9) सकाळी नाशिकहून प्रस्थान झाले आहे. 18 ते 65 वयोगटातील सुमारे तीनशे सायकलिस्ट यात सहभागी होतील. यात 55 महिला सायकलिस्ट्सचा समावेश असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांनी दिली.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने सुरू केलेल्या सायकल दिंडीने आता महाराष्ट्र व्यापला आहे. यंदा महाराष्ट्रभरातील सुमारे 40 सायकलिस्ट्स क्लबचे सुमारे अडीच हजार सायकलिस्ट्स सायकलीने पंढरपूरची वारी करणार असून, पंढरपुरात त्यांचे संमेलनही होणार आहे. या संमेलनाचे यजमान बारामती सायकल क्लब हे असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीनिवास वायकर हे असतील, असे माने यांनी सांगितले. महाराष्ट्रच्या विविध ठिकाणांहून सायकल दिंडीत आलेले हे वारकरी रविवारी (दि.11) सायकलीने पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा करणार आहेत. त्यानंतर एक-एक क्लब रेल्वे मैदानावर रिंगण करून उभे राहतील व वाखरीत होणार्‍या अश्वरिंगणाच्या धर्तीवर येथे सायकलिंगचा रिंगण सोहळा पार पडेल. त्यानंतर याच मैदानावर महाराष्ट्रातील सर्व क्लबचे संमेलन होणार आहे. या संमेलनात प्रदूषणमुक्तीसाठी सायकलिंगसह सायकल ट्रॅक उभारण्याचे ठराव मांडले जाणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

चंद्रभागेची स्वच्छता
आषाढीनिमित्त पंढरपुरात वारकर्‍यांचा जनसागर उसळतो. त्यामुळे यात्राकाळात येथे मोठ्या प्रमाणात घाण-कचरा जमा होतो. सायकलिस्ट क्लबचे सुमारे पाच हजार वारकरी चंद्रभागेच्या तीरावर स्वच्छता अभियान राबविणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : पर्यावरणपूरक सायकलवारीसाठी तीनशे सायकलिस्टचे आज प्रस्थान appeared first on पुढारी.