नाशिक : पाच गावे, दोन वाड्यांची टॅंकर भागवतो तहान, कोणत्या तालुक्यात हे भीषण दुर्भिक्ष?

चांदवड,www.puddhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष निर्माण झाल्याने तालुक्यातील पाच गावे व २ वाड्यांना शासकीय टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तालुक्यातील नांदूरटेक गावाला पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचा प्रस्ताव चांदवड पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे.

गेल्या महिनाभरापासून अवकाळी पाऊस, गारा अन् कडक ऊन अशा बेरंगी वातावरणामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सध्या एप्रिल महिना उलटल्याने तालुक्यातील विहीर, बोअरवेल, तलाव कोरडेठाक पडले आहेत. पर्यायाने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील दरेगाव, कातरवाडी, कानडगाव, परसूल, डोणगाव ही पाच गावे व धनगरवाडी (हिरापूर), चिंचबारी (नांदूरटेक) या दोन वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी १० हजार लिटर क्षमतेच्या तीन टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

शहरातील चांदवड-लासलगाव चौफुलीवरील महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलकुंभातून ४४ गाव पाणीपुरवठा योजनेच्या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा होत आहे. या पाणीपुरवठा योजनेद्वारा तालुक्यातील ७० ते ७५ गावांना नळपाणी पुरवठा केला जातो. मात्र, या गावांना २० ते २५ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे ४४ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी वेळेत येत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्यापही यात सुधारणा न झाल्याने नागरिकांना भरउन्हात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अशा होतात दररोजच्या खेपा
दरेगाव – ३; कानडगाव – ३; डोणगाव – १; कातरवाडी – १, परसूल – २; चिंचबारी – १ व धनगरवाडी – १

हेही वाचा : 

The post नाशिक : पाच गावे, दोन वाड्यांची टॅंकर भागवतो तहान, कोणत्या तालुक्यात हे भीषण दुर्भिक्ष? appeared first on पुढारी.