नाशिक : पावसासाठी महिलांचे देवाला साकडे

पाऊस

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

परिसरात पाऊस व्हावा यासाठी हनुमाननगर येथील महिलांनी डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन पायी चालत जात पंचक्रोशीचे ग्रामदैवत लोणजाई मातेला पाण्याचा अभिषेक घालून पावसासाठी साकडे घातले. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आलेला आहे. तरीही पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतातील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत, जनावरांना चारा नसल्याने जनावरांचे चाऱ्या अभावी हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या झाली आहे, अशा एक ना अनेक अडचणी पावसाअभावी निर्माण होत आहेत. विंचूर व परिसरात चांगला पाऊस पडावा या अपेक्षांनी हनुमाननगर येथील जवळपास पन्नास महिलांनी डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन लोणजाई मातेचा जयघोष करत, विविध स्वयंरचीत भजने म्हणत हनुमाननगर ते लोणजाई गड पायी चालत जाऊन विंचूरसह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या लोणजाई मातेला पाण्याचा अभिषेक करुन पावसासाठी साकडे घातले.

यापूर्वी २०१५ साली असाच दुष्काळ पडला होता. त्यावेळी पण हनुमाननगर येथील महिलांनी याच पद्धतीने डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन पायी चालत जात लोणजाई मातेला साकडे घातले होते. त्यानंतर पाऊस झाल्याची त्यांची श्रद्धा आहे. यंदाही तशीच दुष्काळाची पुनरावृत्ती होत असल्याने महिलांनी लोणजाई मातेला पावसाचे साकडे घातल्याचे महिलांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : पावसासाठी महिलांचे देवाला साकडे appeared first on पुढारी.