नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी; रश्मी ठाकरे मैदानात

रश्मी ठाकरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर नाशिकमध्ये एकसंघ दिसणाऱ्या शिवसेनेला नंतर मात्र चांगलीच गळती लागली. अजूनही शिंदे गटात जाणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. त्यातच शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नव्याने संघटनात्मक बांधणीच्या हालचाली सुरू केल्या असून, जिल्ह्यात विधानसभानिहाय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामध्ये संपर्कप्रमुख पदापासून ते गणप्रमुखांपर्यंत जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत.

शिवसेनेतील फुटीनंतर प्रारंभी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून शिंदे गटात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उडी घेतली होती. नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात असतानाही पदाधिकारी मात्र शिंदे गटापासून अंतर राखून होते. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेतील एकी कायम असल्याचे प्रारंभी दिसून आले. मात्र, ही एकी फार काळ टिकविता आली नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच असून, ते रोखण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त झाल्याने, ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. रिक्त जागांवर लवकरच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मातोश्रीवरून याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याचे सांगितले जात असून, पुढील काही दिवसांतच या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या पदांवरील काही पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट होण्याचीही शक्यता आहे. त्यामध्ये संपर्कप्रमुख, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, विधानसभाप्रमुख, महिला आघाडी याबाबत नियुक्त्या करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संघटनात्मक बांधणीमागे शिंदे गटात जाऊ इच्छिणाऱ्यांना रोखण्याचाही हेतू असल्याची बाब समोर येत आहे. त्याचबरोबर आगामी निवडणूक लक्षात घेता संघटनात्मक बांधणी ठाकरे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, या संघटनात्मक बांधणीमुळे अनेक कार्यकर्त्यांना पदाची आशा आहे.

पदांची लागणार लॉटरी

नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश करीत पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटातून शिंदे गटात नेण्याची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे या पदाधिकाऱ्यांना त्यांनी तत्काळ शिंदे गटात प्रवेश दिल्याने, ठाकरे गटातील आणखी पदाधिकारी त्यांच्या गळाला लागतील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणी करण्याचे नियोजन केल्याने शिंदे गटात जाऊ इच्छिणाऱ्यांना पदांची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू

नव्याने संघटनात्मक बांधणी करताना निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाणार आहे. त्यामुळे कोणाला काय पद मिळणार याकडे लक्ष लागून आहे. त्यामध्ये संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुख ही जबाबदारी कुणाला मिळते याबाबतही कमालीची उत्सुकता लागून आहे.

रश्मी ठाकरे मैदानात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किल्ल्याची डागडुजी, नवीन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याबरोबरच विस्कटलेली घडी सरळ करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २८ एप्रिल रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी नियोजन बैठका सुरू आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी; रश्मी ठाकरे मैदानात appeared first on पुढारी.