नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग

कोम्बिंग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) सायंकाळी अचानक कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवली. नेहमी रात्री होणारी कारवाई दिवसा झाल्याने गुन्हेगार, टवाळखोरांची धावपळ झाल्याचे चित्र होते. यात शहर पोलिसांनी रेकाॅर्डवरील १५४ गुन्हेगारांवर कारवाई केली.

नाशिकरोड येथे झालेला खून, शहरात होणाऱ्या जबरी चोऱ्यांचे सत्र, हाणामारी, टवाळखोरांचा उच्छाद वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. याआधी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन रात्री राबवले जात होते. त्यामुळे गुन्हेगारांना मोहिमेची सवय झाल्याने ते रात्री सावध असायचे. मात्र मंगळवारी (दि.6) पोलिसांनी अचानक सायंकाळी 6 ते 8 या वेळेत 13 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत माेहीम राबवली. त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलिस उपआयुक्त, पाच सहायक आयुक्तांसह सर्व पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखांचे पथक व पोलिस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. अचानक राबवल्याने या मोहिमेने टवाळखोरांमध्ये दहशत निर्माण झाली. पोलिसांची पथके पाहताच टवाळखोर पसार झाले.

रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन, मिशन ऑल मोहीम राबवल्याने त्याची कल्पना सराईत गुन्हेगारांना आल्याने ते रात्रीच्या वेळी घरी सापडत नसल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले होते. त्यानुसार पोलिसांनी दिवसा अचानक मोहीम राबवून गुन्हेगारांवर कारवाई केली. त्याचप्रमाणे मोहिमेदरम्यान, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडूनही परिसरातील टवाळखोर, गुन्हेगारांची माहिती गोळा केली. त्यामुळे पोलिसांबाबत जनतेत विश्वासार्हता निर्माण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग appeared first on पुढारी.