नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी

www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
कांदादराची कोंडी फोडण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.22) सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांदा दहीहंडी फोडून रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दीड ते दोन तास आंदोलन चालले.

गेल्या चार महिन्यांपासून कांदा बाजारभावाची कोंडी फुटत नाही. राज्यातील आमदारांनी कोटी कोटीच्या दहीहंड्या फोडल्या, मग शेतकर्‍यांना तरीही न्याय का मिळत नाही, असा सवाल करीत लोकप्रतिनिधींसह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. ‘प्रहार’च्या तालुकाभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना समवेत घेत सुरुवातीला बाजार समितीच्या आवारातून फेरी काढून घोषणाबाजी केली. यावेळी काही काळासाठी लिलाव बंद करून शेतकरीही या फेरीत सहभागी झाले. प्रवेशद्वारावर आल्यानंतर रास्ता रोको करण्यात आला तसेच कांद्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. कांदा दराबाबत केंद्र व राज्य शासन तसेच लोकप्रतिनिधी उदासीन असून, शेतकर्‍यांच्या भावनांची कोणतीच दखल घेतली जात नसल्याबद्दल पदाधिकार्‍यांनी जोरदार आसूड ओढले. रास्ता रोकोमुळे सटाणा-मालेगाव रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिस बंदोबस्त तैनात झाला. आंदोलकांच्या भावना व्यक्त झाल्यानंतर तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना निवेदन सादर होऊन आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे, शहराध्यक्ष रुपेश सोनवणे, राहुल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, कुबेर जाधव, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार, सुभाष शिंदे, दीपक खरे, मुंजवाड क्रांती मोर्चाचे गणेश जाधव आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

पुढार्‍यांना गावबंदी करा
आंदोलक शेतकर्‍यांनी राजकीय पक्ष व पुढार्‍यांवर बहिष्कार घालण्याबाबत आवाहन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या अडचणीच्या आणि संकटाच्या काळात राजकीय पक्ष व त्यांचे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसतात. अशा सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना आगामी काळात गावबंदी करा. निवडणुकांवर बहिष्कार घाला, अशी हाक शेतकर्‍यांनी दिली.

आंदोलनातून भावनांना मोकळी वाट

सटाणा बाजार समितीसमोरील सटाणा-मालेगाव रस्त्यावर नेहमीच शेतकर्‍यांकडून आंदोलन होतात. परंतु, या आंदोलनाप्रसंगी शेतकर्‍यांची विक्रमी उपस्थिती दिसून आली. तालुकाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी व युवक त्यात सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर संघटनेच्या पदाधिकार्‍यांव्यतिरिक्त इतरांनीदेखील जोरदार भाषणे करून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रहार संघटनेची सटाणा कृउबासमोर कांदाहंडी appeared first on पुढारी.