नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

माहितीचा अधिकार

नंदुरबार – शोध घेऊनही संबंधित पत्त्यावर माहिती अधिकारात माहिती मागवणारा व्यक्ती सापडत नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने खोट्या नावाने माहिती मागवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोठ्या अपवादाने आढळणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 06/06/2023 रोजी सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये माहिती मिळणेकामी अर्ज सादर केला होता. अर्जदार सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरवार यांनी मागणी केलेली माहिती त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली होती, परंतु दिनांक 12/07/2023 रोजी पोस्ट विभागाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे कळविण्यात आले की, बागवान गल्ली, नंदुरबार येथे सलीम सुलेमान बागवान या नावाचा कोणताही व्यक्ती राहत नाही..

माहितीचा अधिकार अधिनियमान्वये अर्जदार यांनी मागितलेली माहिती देणे संबंधीत शासकीय विभागाला बंधनकारक असते म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सलीम सुलेमान बागवान रा बागवान गल्ली, नंदुरबार या इसमाचा शोध घेवून त्यांना माहिती देण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांना आदेशीत करण्यात आले. परंतु शोध घेऊनही तो सापडला नाही.

या माहिती अधिकारातील अर्जाबाबत व व्यक्तीबाबत संशय आल्याने नंदुरबार शहर पोलीसटाण्याच्या पथकाने देखील गोपनीय माहिती काढली असता सलीम सुलेमान बागवान या नावाचा कोणीही इसम नंदुरबार शहरातील बागवान गल्ली व परिसरात राहत नसल्याचे निदर्शनास आले. टपाल विभागाच्या पोस्टमननेही असा व्यक्ती त्या पत्त्यावर नसल्याचा अहवाल दिला. पोलीसांना त्रास होईल या उद्देशाने खोट्या नावाने केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये काही माहितीची मागणी केली म्हणून दिनांक 18/07/2023 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे खोट्या नावाने माहिती मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनास खोटे नाव सांगून माहिती मागुन पोलीस विभागाच्या वेळेचा अपव्यय करुन त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे नाव, पत्ता वापरणाऱ्या अज्ञात इसमाचा कसोशीने शोध घेवून त्याचेवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमाचा कोणीही गैरवापर करु नये. सार्वजनिक किंवा शासकीय प्राधिकरणांमधील माहिती प्राप्त करुन घेणे हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार असला तरी खोट्या नावाने अथवा खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने अनावश्यक माहिती मागून शासकीय वेळेचा व पैश्याचा अपव्यय करणाऱ्या तसेच प्रशासनास व त्रास देणा-यांची गय केली जाणार नाही. तसे आढळून आल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार

हेही वाचा :

The post नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.