नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाओ’ मोहीम बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. या मोहिमेला थकबाकीदार प्रतिसादच देत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाआधी राबविण्यात येत असलेली थकबाकीदार मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार आहेत.

कोरोना महामारीमुळे बहुतांश करदात्यांनी कर भरण्याकडे पाठ फिरविल्याने महापालिकेच्या मालमत्ताकराच्या (घरपट्टी) थकबाकीचा आकडा 350 कोटींवर पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी मनपाच्या कर आकारणी विभागाकडून केवळ सूचनापत्रांचा फार्स रंगवला जातो. त्यामुळेच सूचनापत्र बजावूनही थकबाकीदार त्याला गांभीर्याने घेत नाही. परिणामी थकबाकी तिजोरीत जमा होत नाही. त्यामुळेच मनपाने थकबाकी वसुलीसाठी गेल्या 17 ऑक्टोबरपासून थकबाकीदारांचे घर, दुकान, कार्यालयांसमोर ढोल वाजवून थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1,258 थकबाकीदारांची यादी महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर जाहीर करत थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वाजविण्यास सुरुवात केली. या मोहिमेला पहिल्याच दिवशी थकबाकीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल 73 लाखांची थकबाकी वसूल झाली. त्यानंतर सुरुवातीच्या पाच दिवसांत मनपाच्या तिजोरीत सुमारे चार कोटी 25 लाख रुपयांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला. मध्यंतरी दिवाळीमुळे महापालिकेने या मोहिमेला काही दिवस ब्रेक दिला. तसेच काही राजकीय पक्षांकडून मनपाच्या ‘ढोल बजाओ’ मोहिमेवरून मनपाला जाब विचारण्यात आल्याने मनपाने आपली भूमिका काहीशी मवाळ केली. मोहीम बंद न केल्यास अधिकार्‍यांच्याच घरांसमोर ढोल वाजविण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने 22 नोव्हेंबरला मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दिवाळी संपल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून ‘ढोल बजाओ’ मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु, त्यास प्रतिसादच मिळाला नाही. 17 आॉक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत सहाही विभागांतील 692 थकबाकीदारांच्या घरांसमोर, दुकाने तसेच कार्यालयांसमोर ढोल वाजवून सुमारे पाच कोटी 34 लाखांची वसुली करण्यात आली. त्यानंतर 4 व 10 नोव्हेंबर य दोन दिवसांत पश्चिम विभागात मोहीम राबवून 28 लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली. यानंतर मात्र मोहीम सुरूच झाली नाही. थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने ढोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता मनपा थकबाकीदार मालमत्तांना जप्ती वॉरंट बजावून थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देणार आहे. यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधित मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतही कोणी सहभागी न झाल्यास महापालिका एक रुपया भरून संबंधित मालमत्ता स्वत:च्या नावे करण्याची प्रक्रिया करणार आहे.

राजकीय दबावाने गुंडाळली मोहीम
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या दबावामुळेच मनपाने ‘ढोल बजाओ’ मोहीम गुंडाळल्याचे बोलले जात आहे. राजकीय पक्षांच्या वरिष्ठांनी मनपाच्या ढोलचा आवाज बंद केल्याची चर्चा असून, ‘ढोल बजाओ’ला सुरुवातीच्या दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून पाच कोटींहून अधिक रक्कम जमा होते आणि त्यानंतर मोहिमेला प्रतिसाद मिळत नसल्याचा मनपाचा दावा अजब वाटतो. तर दुसरीकडे थकबाकीदार मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेलादेखील प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाने पुन्हा ही मोहीम हाती घेणे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. कारण आतापर्यंत तीन वेळा राबविलेल्या लिलाव प्रक्रियेत एकही मालमत्ता मनपाच्या नावे झालेली नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया appeared first on पुढारी.