नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग

fire ball www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी
जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू म्हणून ओळख लाभलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आगीच्या घटना रोखण्यासाठी फायर बॉल बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कार्यालयात फायर बॉलसाठी 20 ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे कार्यालयाची सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

151 वर्षांची परंपरा असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य वास्तूला हेरिटेज वास्तूचा दर्जा लाभला आहे. कार्यालयाच्या आवारात नाशिक प्रांत, तहसीलसह उपनिबंधक, लेखा व कोषागार तसेच विविध विभागांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज हजारोंचा राबता असतो. त्यामुळे प्रशासनाकडून दरवर्षी मुख्य इमारतीसह आवारातील अन्य कार्यालयांच्या सुरक्षेवर भर दिला जातो. यंदा प्रशासनाने कार्यालयातील आगीची घटना घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रणासाठी फायर बॉल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकारातून हे फायर बॉल बसविले जाणार आहेत. बाराशे ते तेराशे रुपयांचा एक याप्रमाणे 20 फायर बॉल प्रशासनाने खरेदीचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी आगीच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्र्वीच जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षातच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी कर्मचार्‍यांनी अग्निप्रतिबंधक सिलिंडरच्या सहाय्याने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला होता. परंतु, कार्यालयाच्या आवारात आजही अशी काही ठिकाणे आहेत, जिथे आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येतील. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास त्यावरील नियंत्रणासाठी फायर बॉलचा पर्याय पुढे आला आहे. वीस ठिकाणी हे फायर बॉल बसविण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे.

फायर बॉल उपयुक्त : जिल्हाधिकारी कार्यालयात ठिकठिकाणी अग्निप्रतिबंधात्मक सिलिंडर बसविले आहेत. मात्र, हे सिलिंडर दरवर्षी रिफिल करावे लागतात. त्या तुलनेत फायर बॉलला तीन वर्षांची गॅरंटी असणार आहे. आग लागल्यास हे फायर बॉल एका विशिष्ट तापमानाला फुटून ते कार्यरत होतील. त्यामुळे त्याच्या हाताळणीत मनुष्याची गरज भासणार नसल्याने हे बॉल उपयुक्त ठरतील.

ठिकाणांची निश्चिती : जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी वीज वितरण तारांचे जाळे पसरलेले आहे. अशा ठिकाणी तसेच अन्य काही महत्त्वपूर्ण जागांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर अंतिम 20 ठिकाणे निश्चित करून तेथे फायर बॉल बसविले जातील. महिनाअखेर हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग appeared first on पुढारी.