नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून 66 लाखांची रोकड लुटली

बंदुकीचा धाक दाखवून लुटले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडील वाहनचालकाने एकासह मिळून वृद्ध मालकास बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शरणपूर रोड ते पाथर्डी फाटा दरम्यान घडली. याप्रकरणी कन्हैयालाल चेतनदास मनवाणी (७२, रा. सिंधी कॉलनी, होलाराम कॉलनी) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

कन्हैयालाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते हॅपी होम डेव्हलपर्स मार्फत स्थावर मालमत्तांची खरेदी विक्री करत असतात. व्यवहारातील पैसे ते घरी नेत असतात. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास एमएच १५ जीएन ९५६७ क्रमांकाच्या कारमधून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्याकडे कापडी पिशवीत ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. कारमधून ते घरी निघाले असता त्यांच्यासह कारचालक देवीदास मोहन शिंदे (रा. सातपूर) हा होता. शरणपूर रोडवरील एका वळणावर आल्यानंतर कार अचानक थांबली. काही क्षणात कारमध्ये एक युवक बळजबरीने शिरला व कारमध्ये बसला. त्यानंतर कारचालक देविदासने कार सुरु करून ती पाथर्डी फाट्याच्या दिशेने नेली. पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्याच्याकडील पिस्तुलचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पाथर्डी फाटा येथील जैन मंदिराजवळ आल्यानंतर देविदासने कार थांबवली व कन्हैयालाल यांना कारमधून खाली उतरवून दिले. त्यानंतर दाेघांनी कन्हैयालाल यांची कार व रोकड घेऊन पळ काढला. कारमधून खाली उतरल्यानंतर कन्हैयालाल यांनी घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून कारचालक देविदास शिंदे व त्याच्या साथीदाराविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, गुन्हे शाखेचे पथक, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रविण चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी संशयितांच्या मागावर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

कन्हैयालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वीच देविदास शिंदे यास चालक म्हणून नोकरीस ठेवले होते. आर्थिक व्यवहार झाल्यानंतर पैसे घरी नेत असल्याचे शिंदे याच्या लक्षात आल्याने त्याने ही चोरी केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

The post नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून 66 लाखांची रोकड लुटली appeared first on पुढारी.