नाशिक : बच्चे कंपनीच्या फेवरेट गारेगार पेप्सीचे मार्केट जोरात

pepsi www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आइस्क्रीम, कुल्फी, शेक, ज्यूस, बर्फ गोळा याबरोबरच विविध फ्लेवरमध्ये मिळणारी बर्फाची पेप्सी (आइस कँडी) लहान मुलांची सर्वात फेवरेट आणि जवळची. उन्हाळा सुरू झाला, शाळांना सुटी लागली की, दुपारच्या वेळी लहान मुलांच्या हातात हमखास एक रुपयात मिळणारी पेप्सी दिसतेच दिसते.

पावसाळ्याचा हंगाम सोडला, तर वर्षातील इतर हंगामांत पेप्सीचे प्रॉडक्शन सुरूच असते. परंतु तुलनेने फेब्रुवारी ते जून दरम्यान पेप्सीची विक्री सर्वाधिक हाेते. मुलांच्या पेप्सी खाण्याने पालकांना बऱ्याचदा त्यांची चिंता असते. परंतु विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार पेप्सी तयार करण्यासाठी मिनरल वॉटरचा उपयोग केला जातो. त्यामध्ये पाण्यासोबत फ्लेवर कलर आणि शुगर एवढ्याच गोष्टींचा वापर केला जातो. प्रॉडक्शन हाउसमध्ये या पेप्सी पाण्याच्या स्वरूपात असतात आणि विकत घेतल्यानंतर आठ तास फ्रीजरमध्ये ठेवल्यावर त्या खाण्यासाठी रेडी होतात. त्यामुळे किरकोळ विक्रेते घेताना त्या पाणी स्वरूपातच असतात. शिवाय या पेप्सींची शेल्फ लाइफ जास्त असल्यामुळे त्या कितीही दिवस फ्रीजरमध्ये राहून खाण्यायोग्य राहू शकतात.

रुपयाच्या पेप्सीचे लाखोंचे मार्केट
पेप्सी तयार करण्याचे छोटेसे पिठाच्या गिरणीसारखे मशीन असते. त्यामध्ये मिनरल वॉटर, फ्लेवर कलर, साखर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केले जाते आणि छोट्या पिशव्यांमध्ये त्याचे पॅकिंग केले जाते. एका दिवसाला ४ ते ५ हजारांचे प्रॉडक्शन एका युनिटमध्ये केले जाते. त्यानुसार महिन्याला लाखो रुपयांचा नफा एका युनिटला होतो. कोणत्याही फ्लेवरची पेप्सी एक रुपयाला, तर लस्सी दोन रुपयांना मार्केटमध्ये मिळते. होलसेल भावात घ्यायची झाल्यास २५ पेप्सींचे पॅकेट १५ रुपयामध्ये मिळते.

पेप्सीचे फ्लेवर असे…
रोझ, ऑरेंज, लिम्का, ब्लूबेरी, माझा, मिरिंडा, जिरा, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, कच्ची कैरी, तर लस्सीमध्ये व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर मिळतो. मिल्कमध्ये पेप्सीमध्ये पिस्ता आणि रोझ फ्लेव्हर मिळतात. पैकी जिरा पेप्सी पाठोपाठ लस्सी रोझ, कच्ची कैरीला सर्वाधिक मागणी असते.

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पेप्सी सर्वांचीच आवडती आहे. गेल्या ३० वर्षांपासून आम्ही पेप्सीचा व्यवसाय करतो. फक्त पावसाळ्यात प्रॉडक्शन बंद असते. इतर सिझनमध्ये पेप्सीला मागणी असल्याने माल पडून राहात नाही. लगेचच संपून जातो. -पायल पंजवानी, पेप्सी उत्पादक.

हेही वाचा:

The post नाशिक : बच्चे कंपनीच्या फेवरेट गारेगार पेप्सीचे मार्केट जोरात appeared first on पुढारी.