नाशिक बाजार समिती निवडणूक : पिंगळे-चुंभळे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन ; अर्ज दाखल

पिंगळे, चुंबळे गट

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी माजी सभापती देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, माजी संचालक दिलीप थेटे तसेच बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. एकूण २४६ अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शुक्रवारी (ता. ३१) माजी खासदार तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवीदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील यांच्या गटातील काही सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

प्रत्येक वेळी झालेल्या निवडणुकीत सभासद पाठीशी राहिले. बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था आहे. ही संस्था जपण्यासाठी निवडणूक रिंगणात आहे. नाशिक बाजार समितीला जिल्हा बँक होऊ देऊ नका. बाजार समितीत प्रशासक असल्याने शेतकऱ्यांची २ कोटींची फसवणूक झाल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संस्था वाचविण्याची गरज आहे.

– देवीदास पिंगळे, माजी सभापती

भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन, खा. हेमंत गोडसे, दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सक्षम असे पॅनल राहील. सभापती असताना केलेल्या विकासकामांना सभासद पाठिंबा देतील. तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणून दाखवली. त्यामुळे पुन्हा एकदा मतदार कौल देतील, असा विश्वास आहे.

– शिवाजी चुंभळे, माजी सभापती

यांचे उमेदवारी अर्ज दाखल

संपतराव सकाळे, बहिरू मुळाणे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, निर्मला कड, रूपांजली माळेकर, संजय तुंगार, राजाराम धनवटे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम , जगदीश अपसुंदे, युवराज कोठुळे.

हेही वाचा : 

The post नाशिक बाजार समिती निवडणूक : पिंगळे-चुंभळे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन ; अर्ज दाखल appeared first on पुढारी.