नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण

बिबट्याशी झुंज,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शेतातून घरी परतत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने जवळपास अर्धा तास झुंज देत तरुणाने स्वतःचा जीव वाचविल्याची घटना तालुक्यातील जामगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

अविनाश मधुकर बोडके (२४) असे या तरुणाचे नाव असून, बोडके यात जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अविनाशची आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, तो शेतीचे कामही करतो. त्यांची जामगाव शिवारात शेती आहे. मंगळवारी अविनाश शेतातून घरी परतत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ल चढविला. मात्र, त्याने बिबट्याशी धैर्याने सामना करत बिबट्याला ढकलून दिले. यावेळी अविनाशचा रौद्रावतार पाहून बिबट्याने माघार घेतली. मात्र, या हल्ल्यात अविनाशच्या डोक्याला, गालाला तसेच पोटावर व ओठांवर किरकोळ जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन अविनाशची चौकशी केली तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरादेखील लावण्यात आला. 

हेही वाचा :

The post नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण appeared first on पुढारी.