नाशिक : बीएड सीईटी परीक्षा गोंधळावर आमदार सत्यजित तांबेंचा संतप्त सवाल

सत्यजित तांबे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बीएड प्रवेश परीक्षेच्या वेळी नाशिकमध्ये बुधवारी (दि. 26) गोंधळ झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. मात्र, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्या आयोजनात सातत्याने गोंधळ होत असून, खासगी कंपन्यांना काम देण्यावरच तांबेंनी आक्षेप नोंदविला आहे. खासगी कंपन्यांना प्रवेश परीक्षांचे काम कशासाठी? असा संतप्त सवाल आ. तांबे यांनी उपस्थित केला आहे.

बीएड सीईटी परीक्षेच्या नाशिक केंद्रासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही देण्यात आले होते. मात्र, हे विद्यार्थी नाशिक येथील परीक्षा केंद्रांवर पोहोचले, तेव्हा त्यांना परीक्षा 25 एप्रिलला झाल्याचे सांगण्यात आले. हॉल तिकिटावर 26 एप्रिल अशी तारीख असल्याने विद्यार्थ्यांनीही आपलीच बाजू योग्य असल्याचा दावा केला. परीक्षा आदल्या दिवशीच झाल्याचे आणि हॉल तिकिटावर चुकीची तारीख छापल्याचे निदर्शनास आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे ट्विट आ. तांबे यांनी केले. सीईटी सेलच्या नरमाईच्या भूमिकेने या विद्यार्थ्यांचे नुकसान टळले. मात्र, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्या आयोजनात असे गोंधळ आजकाल नेहमीच होत आहेत. या कंपन्यांचे नियोजन खासगी कंपन्यांच्या हाती दिल्यापासून हे गोंधळ वाढले असून, सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : बीएड सीईटी परीक्षा गोंधळावर आमदार सत्यजित तांबेंचा संतप्त सवाल appeared first on पुढारी.