नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील मॉडेल स्कूलसाठी व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदी करण्यासाठी जेम (GEM) पोर्टलवरून खरेदी करण्यात यावी, असे ग्रामविकास विभागाचे आदेश असताना शिक्षण विभागाने मात्र ऑफलाइन निविदा प्रसिद्ध केली आहे. याचा परिणाम भविष्यात ही खरेदी प्रक्रिया वादात सापडेल, अशा चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात झडत आहेत.

जिल्हाभरात पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या १०० शाळा मॉडेल स्कूल साकारण्यात येत आहेत. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच ई- लर्निंगच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाढत्या जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी आ‌वश्यक असे शिक्षण मिळणार आहे. यासाठी लागणाऱ्या व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी १० लाख रुपये मंजूर केले आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाने १० लाख रुपयांच्या निधीतून दूरस्थ शिक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी पुरवठादारांकडून बंद लिफाफ्यात दरपत्रक मागवले होते. त्यासाठी एक बंगळुरू व अमेरिकेतील दोन कंपन्यांचे असे तीन दरपत्रक आले. नाशिक जिल्हा परिषदेत १० लाख रुपयांच्या व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदी करायच्या आहेत, हे अमेरिकन कंपन्यांना कसे समजले, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

त्यातच नेमके त्याचवेळी ग्रामविकास विभागाने यापुढे कोणतीही खरेदी जेम (GEM) पोर्टलवरूनच करावी, असे आदेश देणारे परिपत्रक निर्गमित केले. या परिपत्रकाचा आधार घेत वित्त विभागाने व्हर्च्युअल रिअल सिस्टिमची खरेदी GEM पोर्टलवरून करावी, असा शेरा मारला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने GEM पोर्टलवरून खरेदी करण्यास परवानगी मिळावी यासाठीचा प्रस्ताव सादर केला. मात्र, सीईओ मित्तल यांनी ऑफलाइन खरेदी करण्याच्या सूचना दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ही खरेदी ऑफलाइन होणार आहे. ग्रामविकास विभागाने मागील महिन्यात निर्गमित केलेल्या पत्रकानुसार जेम (GEM) पोर्टलवरून खरेदी करताना स्थानिक उत्पादकांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. ही खरेदी करताना ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाचे पालन होणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.

७ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार, १० लाखांच्या आतील खरेदी करू शकतो; तसेच संबंधित वस्तू पोर्टलवर उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

– भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा : 

The post नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास appeared first on पुढारी.