नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

sanjay raut संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजपबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर सूत जुळवण्याच्या वावड्या जे कोणी उठवत असतील, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे, अशा शब्दांत भाजपबरोबर सूत जुळविण्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले नेते आणि त्यांची गद्दारी कधीही विसरता येणार नाही. गद्दार हे सूर्याजी पिसाळांची औलाद आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी भाजपसह शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल केला. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटे येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा विचार येत नाही, त्यामुळे अशा चर्चा निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शिवराज्याभिषेकावरून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. सत्ताधारी जे करत आहेत, ते अगदीच हास्यास्पद आहे. महाराजांचा राज्याभिषेक ही मोठी गोष्ट आहे, त्यात शंकाच नाही. मात्र, सत्ताधारी निवडणुकीवर डोळा ठेवून काहीतरी करत आहेत. त्यांचे काही काम असेल, तरच अशा थोर विभूतींचा पुळका त्यांना येतो. त्यातून ते इव्हेंट साजरे करतात. त्यामध्ये आपुलकी, प्रेम कमी असते. मात्र, त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर सत्ताधाऱ्यांचा डोळा असतो. शिवसेनेवर (शिंदे गट) टीका करताना ते म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. ती भावनाशून्य लोक असून, त्यांनी स्वतःच जोडे मारले पाहिजे. त्यांच्या टीकेमुळे खऱ्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. शिवशाहीची गद्दारी करून आता ते शिवाजी महाराजांचा जयजयकार करत असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

अजित पवारांवर टीकास्त्र

मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणले गेले. वीर सावरकरांनी पाहिले की, त्यांची माहिती देणारा बेईमान कोपऱ्यात उभा आहे. त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणे ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणे ही संस्कृती असल्याचे दाखवून दिले होते. इतिहासात त्याची नोंद असल्याचे सांगत, अजित पवारांच्या टीकेला, धरणात लघुशंकेचे वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणे चांगले आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते, अशा शब्दांत उत्तर दिले.

नाशिकवर आमचाच दावा!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुरूच असून, त्यावर राऊत म्हणाले, प्रत्येकाला वाटते की, ४८ जागा निवडून येतील. पण तसे होत नाही. काँग्रेसला एकच जागा मिळाली. राष्ट्रवादीला चार, तर आम्हाला १८ जागा मिळाल्या. त्यात नाशिकचाही समावेश आहे. नाशिकचा गद्दार सोडून गेला. पण शिवसेना ही जागा जिंकेल. त्या दृष्टीने आमची तयारी सुरू असून फक्त आम्ही बोलत नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही - संजय राऊत appeared first on पुढारी.