नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज प्रचाराचा नारळ फोडणार

चंद्रशेखर बावनकुळे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या हातून एक प्रकारे प्रचाराचाच नारळ वाढविला जाणार आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपकडून निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी केली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची निवड झाली. त्यामुळे बावनकुळे यांच्याकडून महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे आखले जात आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. रविवारी (दि. ११) सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर बाइक रॅलीद्वारे शहरात त्यांचे आगमन होणार आहे. नाशिकरोड विभागातील काही महत्त्वाच्या चौकाचौकांतून ही बाइक रॅली जाणार आहे. त्यानंतर द्वारका, मुंबई नाकामार्गे कालिका माता मंदिर येथे रॅलीचा समारोप होईल. कालिदास कलामंदिर येथे दुपारी २.३० ते ४ या कालावधीत ते सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ७.१५ या वेळेत पंचवटी कारंजा येथे नाशिक युवा वॉरियर्स शाखेचे उद‌्घाटन आ. बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

रणनीतीसाठी कोअर कमिटीची बैठक

या दौऱ्यातच बावनकुळे हे शहर व जिल्हा कोअर कमिटीच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत. यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जाणार आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असताना, केलेल्या विविध विकासकामांवर फोकस करून ही कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. बैठकीला भाजपचे पाच आमदार, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच समितीचे सदस्य उपस्थित असतील.

कार्यकर्ता मेळाव्याकडे लक्ष लागून

कोअर कमिटीच्या बैठकीनंतर बावनकुळे यांच्या उपस्थितीत स्प्लेंडर हॉल येथे दुपारी १२ ते २ या वेळेत संघटनात्मक अर्थात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यात ते कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे लक्ष लागून आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष प्रथमच नाशिकमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसून येत आहे. एकूणच आगामी महापालिका निवडणूक पाहता, नूतन प्रदेशाध्यक्षांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज प्रचाराचा नारळ फोडणार appeared first on पुढारी.