नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

घरपट्टी नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेने पहिल्यांदाच मार्चअखेर घरपट्टी वसुलीचे लक्ष्य पूर्ण करत १८७ कोटींची वसुली केली आहे. घरपट्टीसाठी आयुक्तांनी १८५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. 100 टक्के घरपट्टी वसूल झाल्याने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पाणीपट्टी मात्र मागील वर्षापेक्षा एक कोटीने कमी झाली आहे.

महापालिकेचा महसूल जीएसटी, पाणीपट्टी, घरपट्टी आणि विकास शुल्क यावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आधारलेला आहे. त्यापैकी जकातीच्या बदल्यात शासनाकडून दर महिन्याला महापालिकेला परतावा प्राप्त होत असतो, तर उर्वरित महसुलाचे स्रोत हे मनपालाच तयार करावे लागतात. त्यामुळे मनपा प्रशासनाचा सर्वाधिक फोकस असतो तो घरपट्टी, पाणीपट्टी आणि विकास शुल्क यावरच. त्यादृष्टीने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आणि त्याआधी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीकरिता विविध कर आकारणी विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार कर विभागाने थकबाकीदारांच्या घर आणि कार्यालयासमोर ढोल बजाओ मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचा मोठा फायदा मनपाला झाला. त्याचबरोबर एप्रिल, मे आणि जून तीन महिन्यांत कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना अनुक्रमे ५, ३ आणि २ टक्के सवलत देण्यात येत असल्याने या सवलत योजनेमुळेही मनपाच्या तिजोरीत कर जमा होऊ शकला आहे.

मनपा आयुक्तांनी कर विभागाला घरपट्टीसाठी सुरुवातीला १७५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यात नंतर वाढ करून उद्दिष्ट १८५ कोटी केले होते. कर विभागानेदेखील तारेवरची कसरत करत हे उद्दिष्ट गाठत १८७ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षापेक्षा ३८ कोटी ३२ लाख ८० हजार ३४१ रुपये अधिक वसूल झाले आहेत. मागील वर्षी १४९ कोटी दोन लाख ५२ हजार ८५९ रुपयांचा कर वसूल झाला होता.

सर्वाधिक कर सिडकोतून

मनपाच्या सहा विभागांपैकी सर्वाधिक कर वसुली ही सिडको विभागातून झाली आहे. सिडको विभागाने ४० कोटी ७० लाख ८५ हजार ६७५ रुपये घरपट्टी वसूल केली असून, मागील वर्षी २८ कोटी ८८ लाख १९ हजार ९४० रुपये वसूल झाले होते. म्हणजे मागील वर्षापेक्षा सिडको विभागाने ११ कोटी ८२ लाख ६५ हजार अधिक वसूल केले आहेत. विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्याकडे सिडको आणि सातपूर असा दोन विभागांचा कार्यभार आहे. असे असूनही त्यांनी सिडको विभाग वसुलीमध्ये मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर सातपूर विभागाने २१ कोटी ३२ लाख १८ हजार ८०५, नाशिक पश्चिम विभागाने ३१ कोटी ८९ लाख आठ हजार ४६९, नाशिक पूर्वने ३० कोटी ५७ लाख ३० हजार ८९२, पंचवटी विभागाने ३५ कोटी ३४ लाख ८८ हजार ६२४, तर नाशिकरोड विभागाने २७ कोटी ५१ लाख ७३५ रुपये कर वसूल केला आहे.

पाणीपट्टी ६३ कोटी ८८ लाख

मनपा प्रशासनाने घरपट्टीत उद्दिष्टाहून अधिक कर वसूल केला असला, तरी पाणीपट्टीत मात्र मागील वर्षापेक्षा कमी कर मिळाला आहे. मागील वर्षी मनपाने ६४ कोटी ९१ लाख १५ हजार ३८९ रुपये कर वसूल केला होता. यंदा म्हणजे २०२२-२३ मध्ये मार्चअखेर ६३ कोटी ८८ लाख ४८ हजार ८७३ रुपयांची पाणीपट्टी तिजोरीत जमा झाली आहे.

नव्या आर्थिक वर्षात २०० कोटींचे उद्दिष्ट

२०२३-२४ या नव्या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २०० कोटींहून अधिक दिले जाणार आहे. यामुळे या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच कर आकारणी विभागाला कर वसुलीवर जोर द्यावा लागणार आहे. २०२२-२३ मध्येदेखील २०० कोटींपर्यंत कर वसुली झाली असती. कारण शासकीय कार्यालयांकडेच ५० कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी काहीच वसुली झालेली नाही. त्याचबरोबर शासनाकडून १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी शासनानेदेखील 100 टक्के कर वसुलीचे निर्देश दिले आहेत. उद्दिष्ट न गाठल्यास १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त होण्यावर परिणाम होऊ शकतो.

प्रथम नाशिककरांचे आभार की, त्यांनी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर भरणा केला. या कराच्या पैशांचा विनियोग नाशिककरांना सुविधा देण्यासाठी केला जाईल. नागरिकांना वेळीच बिले देता यावी, यासाठी येत्या काळात एजन्सीची नेमणूक केली जाणार असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त-मनपा

हेही वाचा : 

The post नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली appeared first on पुढारी.