नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर

नाशिक मनपा आयुक्त अशोक करंजकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासनाने तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक महापालिकेला आयुक्त दिले असून, डॉ. ए. एन. करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. करंजकर हे राज्याचे ईएसआय आयुक्त म्हणून कार्यरत होते. सोमवारी (दि. २४) ते आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे कळते. ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, मागील काळात महापालिकेच्या कामकाजाचा विस्कळीत झालेला गाडा पुन्हा रुळावर आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार हे मसुरीतील प्रशिक्षण संपवून पुन्हा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणार असताना, मागील २ जूनला त्यांची बदली झाली. या घडामोडीनंतर महापालिकेला आठवडाभरात नवे आयुक्त मिळतील, अशी अपेक्षा होती. पण तब्बल दोन महिने होत आले, तरी भाजप व शिवसेना (शिंदे गट) या दोघांनीही मर्जीतील अधिकार्‍यांसाठी संघर्षामुळे शर्यतीत असलेल्या अर्धा डझन नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होऊ शकले नव्हते. त्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आदींच्या नावांचा समावेश होता. पण शेवटच्या टप्प्यात ही सर्व नावे बाद झाली व करंजकर यांचे नाव आघाडीवर आले. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमापूर्वी नवीन आयुक्तांची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. पण त्याला मुहूर्त लागला नाही. अखेर शुक्रवारी (दि. 21) ४१ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली. त्यात करंजकर यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासमोर अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपलेला कुंभमेळा नियोजन व तयारी यांसह रोजच्या कामाला गती देण्याचे आव्हान असेल.

The post नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर appeared first on पुढारी.