नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता

नाशिक मनपा आयबीपीएस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेत ७०६ पदांच्या नोकरभरती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेने तयारी दर्शविली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव नाशिक महापालिकेला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार भरतीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आयबीपीएस प्रतिनिधींसोबत पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जानेवारी महिन्यात नोकरभरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या साडेसात हजार पदांपैकी आजमितीस सुमारे पावणेतीन हजार इतकी पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या मनुष्यबळावर कामाचा ताण निर्माण झाला आहे. प्रशासकीय कामकाज करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आस्थापना खर्चाची मर्यादा, सुधारीत आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने गेल्या १२ वर्षाहून अधिक कालावधीपासून मनपाची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. रिक्त पदांचा सर्वाधिक फटका हा कोरोना महामारीच्या काळात बसला. आरोग्य वैद्यकीय व अग्निशमन या अत्यावश्यक सेवा पुरविताना मनपासमोर अनेक अडचणी आल्या. किमान महत्वाची व अत्यावश्यक सेवेतील पदांना मंजुरी द्यावी, अशी मागणी मनपाकडून शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजूरी दिली होती. मात्र, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने ही भरती प्रक्रिया देखील काही काळ रखडली होती. शासनाने आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमनच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजूरी दिल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला. शासनाने नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती केली. त्याबाबतचा शासन निर्णय महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएसने महापालिकेला प्रस्ताव सादर केला असून, प्रस्तावाचा अभ्यास प्रशासनाकडून केला जात आहे.

दोनपैकी आयपीबीएसकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून, अद्याप टीसीएसचा प्रस्ताव येणे बाकी आहे. या दोन्ही संस्थांपैकी योग्य त्या संस्थेशी करारनामा करून भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

शासन आदेशानुसार टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फत महापालिकेतील नोकर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. आयबीपीएसने प्रस्ताव सादर केला आहे.

– मनोज घोडे पाटील, उपायुक्त प्रशासन

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी "आयबीपीएस'ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता appeared first on पुढारी.