नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीची तारीख बदलली, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

निवडणूक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची दुसऱ्यांदा तारीख बदलल्यामुळे उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. निवडणूक रंगात येत असताना निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा निवडणुकीची तारीख बदलून 30 एप्रिल केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांची निवडणूक होत असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 14 बाजार समित्यांची निवडणूक 28 एप्रिल, तर मनमाड बाजार समितीची निवडणूक 30 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सर्वच बाजार समित्यांची निवडणूक 28 एप्रिलला असताना मनमाडची 30 एप्रिललाच का? असा प्रश्न उपस्थित करून अनेकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने तारखेत बदल करून मनमाड बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिल रोजी घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार काही उमेदवारांनी प्रचारदेखील सुरू केला. मात्र, पुन्हा निवडणुकीची तारीख बदलून 30 एप्रिल करण्यात आली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीबाबत घोळ का घालत आहे, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

आज चित्र स्पष्ट होणार

नाशिक जिल्ह्यात मनमाड बाजार समिती मोठी मानली जाते. ही बाजार समिती काबिज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावतात. एकूण 18 जागांसाठी तब्बल 150 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतील, हे स्पष्ट होईल. मात्र, वारंवार निवडणुकीची तारीख बदलली जात असल्याने उमेदवार आणि मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

The post नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीची तारीख बदलली, 'या' तारखेला होणार निवडणूक appeared first on पुढारी.