नाशिक : मसगा महाविद्यालय; शैक्षणिक मार्गदर्शनाच्या आडून धर्म प्रसार?

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव)  : पुढारी वृत्तसेवा
शहरातील एका महाविद्यालयात घेण्यात आलेल्या शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरात विशिष्ट धर्माचा प्रचार – प्रसार करण्यात आल्याच्या संशयावरून मोठा गोंधळ उडाला. हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. विविध पातळ्यांवर पडताळणी होऊन अखेर छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

श्याम देवरे यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सत्य मालिक लोकसेवा ग्रुपने मसगा महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाइडन्स प्रशिक्षणाचे आयोजन रविवारी (दि. 11) सकाळी केले होते. त्या ठिकाणी शिक्षण तज्ज्ञांऐवजी एका धर्माचे काही गुरू हे त्यांनी एका विशिष्ट धर्मातील उपाशी आणि गरिबांविषयीच्या धोरणाविषयी माहिती देत होते. त्या शिकवणीचा लाभ झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगतही या ठिकाणी ऐकविण्यात आले. विशिष्ट धर्माच्या दिनक्रमाचा अभ्यासावर किती चांगला प्रभाव पडतो, याविषयी स्वानुभव सांगण्यात येऊन इतर धर्मांपेक्षा विशिष्ट धर्मच कसा श्रेष्ठ आहे, असे सांगण्यात येऊन प्रार्थनास्थळात शनिवार ते गुरुवारपर्यंत येण्याचे आवाहन केले जात होते. हा सर्व धर्मांतराचा प्रयत्न असल्याचा आक्षेप घेण्यात येऊन कार्यक्रम बंद पाडण्यात आला असता गोंधळ उडाला होता. कार्यक्रमस्थळी लावलेले बॅनर्सही काढून घेतले गेले. या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिसांनी गर्दी पांगवली. दरम्यान, घटना वार्‍यासारखी पसरून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही धाव घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील वस्तुस्थिती जाणून घेतली. तर देवरे यांनी फिर्याद दिली. शिक्षणासाठी आर्थिक आमिष दाखवून विशिष्ट धर्माचा प्रचार करणार्‍या आयोजकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राचार्यांचे निलंबन
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेने प्राचार्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. याबाबत स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी सायंकाळी निवेदन जाहीर केले. प्राचार्यांनी व्यवस्थापन समितीची परवानगी घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी परस्पर कार्यक्रम घेतल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉ. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी अहवाल येत नाही, तोपर्यंत प्राचार्यांना निलंबित करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : मसगा महाविद्यालय; शैक्षणिक मार्गदर्शनाच्या आडून धर्म प्रसार? appeared first on पुढारी.