नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेचा कारभार सध्या ‘प्रभारी’ झाला आहे. बदली, निवृत्ती अन् लाचखोरीच्या प्रकारांमुळे बहुतांश विभागाच्या चाव्या प्रभारी कारभाऱ्यांकडे आल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर इतरही प्रमुख विभागांत प्रभारी राज असल्याने, जनसेवेच्या कामांवर याचा स्पष्ट प्रभाव दिसून येत आहे.

मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले अन् बदली घेऊनच परतल्याने, त्यांनी विभागीय आयुक्तांकडे सोपविलेला पदभार कायम ठेवावा लागला. कारण नाशिक महापालिका आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नेमणूक केली नसल्याने, तूर्तास विभागीय आयुक्तांवरच या पदाची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर मनपा मुख्यालयातही निवृत्ती, बदल्यांसह बऱ्याच घडामोडी घडल्याने बहुतांश विभागात प्रभारी राज दिसून येत आहे. महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याने अन् घोडे-पाटील रजेवर असल्याने हा विभाग सध्या वाऱ्यावर आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके गेल्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा प्रभारी पदभार विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

तर शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर या लाच प्रकरणी अटकेत असल्याने, महापालिकेचा शिक्षण विभाग सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांमध्ये शहरातील शाळा सुरू होणार असून, या विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न प्रलंबित असून, शाळांच्या डागडुजीच्या कामांना अजून मुहूर्त लागला नसल्याची विदारक स्थिती आहे. अशात या विभागाला कोणी वालीच नसल्याने, महापालिका शाळा गणवेशासह विद्यार्थी संख्या व इतर कारणांनी पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

आयुक्तपदी कोण?

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर मनपा आयुक्तपदी कोण? याची नाशिककरांना उत्सुकता आहे. आयुक्तपदासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कामगार आयुक्त करंजकर तसेच फिल्म सिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. यामध्ये माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या गुड बुकमध्ये असलेल्या मनीषा खत्री यांच्याकडे पदभार जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : महापालिकेचा 'प्रभारी' कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर appeared first on पुढारी.