नाशिक : महापालिकेच्या करवसुलीला पुन्हा ब्रेक

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या विविध कर विभागातील १२५ कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारकार्ड, आधार जोडणीच्या कामाला जुंपल्याने मनपाच्या करवसुलीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. मागील वेळीदेखील मतदार यादी तयार करण्याच्या कामाला कर्मचारी वर्ग केल्याने करवसुलीला खिळ बसली होती. आधीच कोरोना महामारीमुळे करवसुलीवर परिणाम झालेला आहे, त्यात जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर वारंवार वेगवेगळी जबाबदारी दिली जात असते.

जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकीत मोठी वाढ होत आहे. आताही करवसुलीकरिता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच या कर आकारणी विभागातील १२५ कर्मचाऱ्यांना मतदारकार्ड – आधारकार्ड जोडणीला जुंपण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेच्या करवसुलीला मोठा फटका बसला. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर आजमितीस 500 कोटींहून अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महापालिकेने करवसुलीला प्राधान्य दिले. मनपाने अभय योजना आणि करसवलत योजना लागू केली. घरपट्टी वसुलीसाठी या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. मात्र, या विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा निवडणुकीच्या प्रभाग रचना आणि मतदार याद्यांच्या कामांसाठी केल्यामुळे करवसुली ठप्प झाली होती. पाणीपट्टीची देयके वाटपच होऊ शकली नाहीत. प्रशासनाने करवसुलीसाठी पुन्हा सुरुवात केली असता, मतदार कार्डाला आधारकार्ड जोडणीच्या कामासाठी जिल्हा निवडणूक विभागाने शिक्षकांसह वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. दि. १९ ते २३ सप्टेंबर या पाच दिवसांत हे काम केले जाणार आहे. तोपर्यंत तरी करवसुली थांबणार आहे.

मनपाचा करवसुलीचा ढोल वाजेना

घरपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वाजविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन कर विभागाकडून केले जात असले, तरी या विभागातील कर्मचारी मतदारकार्ड आधार जोडणीच्या कामासाठी वर्ग केल्यानेच महापालिकेच्या करवसुलीचा ढोल वाजू शकला नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेच्या करवसुलीला पुन्हा ब्रेक appeared first on पुढारी.