SSS Result : गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत संधी, १४ जूनला मिळणार गुणपत्रिका

गुण पडताळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. २) जाहीर झाला. शनिवार (दि. ३) पासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी २२ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच शुल्कही भरता येणार आहे.

दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या https://verification.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेला सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै – ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४) श्रेणी / गुणसुधार योजने अंतर्गत उपलब्ध राहतील. तर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत दि. १४ जून २०२३ रोजी दुपारी ३ ला वितरीत करण्यात येतील.

पुरवणी परीक्षेसाठी ७ जूनपासून प्रक्रिया

पुरवणी परीक्षा जुलै – ऑगस्ट २०२३ मध्ये होणार असून, पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रियाही ऑनलाइन राहणार असून, विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा :

The post SSS Result : गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत संधी, १४ जूनला मिळणार गुणपत्रिका appeared first on पुढारी.