नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल आणि डिझेलचे पैसे घेण्यासाठी कार्ड स्वॅप करून इंटरनेट बंद असल्याचे सांगत कार्ड ठेवून घेत ६ लाख काढून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार संजय पवार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रामअवतार सिंह श्रीहरफूल सिंह (वय 45, रा. राजस्थान, सध्या रा. हिसवळ बु.) यांनी तक्रार दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामअवतार सिंह राजेंद्र सिंह भाम्बू इन्फ्रा या कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्या व मशीनरीसाठी लागणारे पेट्रोल व डिझेल हे माजी आमदार संजय पवार यांच्या नागापूर येथील सिद्धिविनायक पेट्रोलपंपावरून भरून हिसवळ बु. येथील कंपनीच्या प्लांटवर आणले जात होते. इंधनाचे बाकी राहिलेले 30 हजार रुपये देण्यासाठी कंपनीचे डिझेल इन्चार्ज राकेश कुमार यांनी पैसे देण्यासाठी कंपनीचे कार्ड पेट्रोलपंप मालकाचा मुलगा सूरज पवार यांना दिले.

सूरज पवार यांनी इंटरनेट प्रॉब्लेम असल्याचे सांगून ट्रान्जॅक्शन होत नसल्यामुळे कार्ड ठेवून जा, इंटरनेटची रेंज आल्यावर ट्रान्जॅक्शन करून कार्ड सकाळी देतो, असे राकेश कुमार यांना सांगितले. त्यानुसार राकेश कुमार यांनी कार्ड पवारांकडे ठेवले. मात्र, पवार यांनी गैरफायदा घेत स्वत:च कार्ड स्वॅप करत त्यातून ६ लाख रुपये जास्तीचे काढून फसवणूक केली.

यावरून पोलिसांनी संजय पवार, सूरज पवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. एच. जांभळे करीत आहेत.

हेही वाचा 

The post नाशिक : माजी आमदार पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा appeared first on पुढारी.