नाशिक : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील सुरती फरसाण समोरील मोकळ्या पटांगणात सेवा निवृत्त वायुसेना दलातील कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि २७) रोजी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. रविदत्त राजेंद्र चौंबे (वय ४२) असे मयताचे नाव असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर आज रात्री सात ते साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर म्हसरुळ पोलिसांनी दोघा संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रवी चौबे हे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरती फरसाण कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले. म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, त्यांना शासकिय रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री सुरु होते. चौबे हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. शहरातील एका शैक्षणिक संस्थेत ते वॉर्डन म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

The post नाशिक : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून appeared first on पुढारी.