नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान

दिंडोरी

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी पावसासोबत गारपीट झाल्याने फुलोऱ्यातील बागा, द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. कांदा पिकाची पात व काढणीला आलेला कांदा खराब झाला आहे. भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टोमॅटो कवडीमोल दराने विकला गेला. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणारा शेतकरी द्राक्ष पिकांकडे डोळे लावून बसले होते. पण आता अवकाळीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील तिसगाव, तळेगाव, मावडी, सोनजांब, शिंदवड आदी गावांतील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आमदार नरहरी झिरवाळ, तहसिलदार पंकज पवार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक रुपेश शिरोडे, दत्तात्रेय पाटील, भास्कर भगरे, सर्कल अग्रवाल, तलाठी कांडेकर, नितीन भालेराव, कृष्णा मातेरे, शाम मुरकुटे, संतोष रेहरे आदींनी पाहणी केली. तिसगाव येथील दीपक भालेराव, रोशन ढगे व इतर शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.

लवकरात लवकर सरसकट पंचनामे करावेत, अशा सुचना आमदार झिरवाळ यांनी तहसिलदार पंकज पवार यांना दिल्या. हिवाळी अधिवेशनात जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने देखील राज्याला मदत देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

The post नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.