नाशिक: सटाणा परिसरात पावसाची हजेरी; साल्हेर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

सटाणा: पुढारी वृत्तसेवा: शहर परिसरात रविवारी (दि.२६) बिगरमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी हलक्या सरी कोसळल्या. नंतर सायंकाळी पाचनंतर मात्र दीड तास जोरदार पाऊस झाला. यामुळे काढून ठेवलेला मका भिजला. तर लाल कांदा व उन्हाळी कांदा रोपांची मोठी हानी झाली.

शनिवारी (दि.२५) दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस झाला नाही. रविवारी (दि.२६) मात्र सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. सर्वत्र दाट धुके पसरले होते. दुपारी बाराच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी पाच नंतर मात्र दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाला. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला मका भिजून आर्थिक नुकसान झाले. विशेषतः कांदा रोपांची मोठी हानी झाली. यामुळे कांदा लागवड प्रभावित होणार आहे. यावर्षी आधीच कांदा रोप मर रोगामुळे संकटात असताना या पावसामुळे उरले सुरले रोपही हातातून जाणार आहे. सोबतच लाल कांद्याचीही यामुळे वाट लागणार असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात कुठेही गारपीट झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.

साल्हेर येथील एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू

बागलाण तालुक्यात आज दुपारपासून पाऊस सुरू झाला आहे. आज दुपारी ३ वाजता साल्हेर येथील एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. सुरेश मुरलीधर ठाकरे (वय ३५, रा. भाटंबा साल्हेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या व्यतिरिक्त पाऊस सर्वत्र झाला असून इतर नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा 

The post नाशिक: सटाणा परिसरात पावसाची हजेरी; साल्हेर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.