नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द

स्पर्धा परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या काळात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा जोर ओसरला असून, जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सवलती रद्द करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रम कपात आदी सवलती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना काळात राज्यातील शाळा – महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे दिले जात होते. त्यामुळे परीक्षेसाठी विशेष नियम तयार करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते नववीची परीक्षा ऑनलाइन झाली होती. तर इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा देण्यात आली होती. तसेच 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. अभ्यासक्रमातही काही अंशी कपात करण्यात आल्याने ऐन कोरोनाच्या लाटेत संबंधित परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना काळात दिलेल्या सवलती राज्य शिक्षण मंडळाने रद्द केल्या आहेत. कोरोनापूर्वीचे नियम यंदापासून परीक्षेसाठी लागू होणार आहेत. आगामी दहावी – बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत केंद्र मिळणार नाही. विद्यार्थांना पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा केंद्र दिले जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही मिळणार नाही. सवलती रद्द केल्याने पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द appeared first on पुढारी.