नाशिक : रेल्वे पोलिसांनी रोखली बालकांची तस्करी

बालकांची तस्करी रोखली,www.pudhari.news

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

बिहार येथून सांगली आणि पिंपरी-चिंचवड येथे मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या 59 लहान मुलांना मनमाड आणि भुसावळ येथे रेल्वे पोलिस व आरपीएफ यांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. एका प्रवाशाला संशय आल्यानंतर त्याने ट्विट करून रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुलासोबत असलेल्या चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार येथून ८ ते 1६ वर्ष वयोगटातील 59 मुले आणि 4 शिक्षक (मौलाना) दानापूर एक्स्प्रेसने सांगली आणि पिंपरीला जात होते. त्यांच्याकडे आरक्षित तिकीटदेखील होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने लहान मुले रेल्वेने का जात आहे, या मुलांची तस्करी तर केली जात नाही ना? असा संशय एका प्रवाशाला आल्यानंतर त्याने ट्विटद्वारे रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळ आणि मनमाड आरपीएफशी संपर्क साधून त्यांना याबाबत खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार भुसावळला आरपीएफ यांनी 38 मुलांना, तर मनमाडला आरपीएफ यांनी 21 मुलांना ट्रेनमधून उतरवून घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी सर्व मुले आणि त्यांच्यासोबत असलेले शिक्षक (मौलाना) यांची चौकशी केल्यानंतर मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, सोबत असलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांना मदरशात दाखल करण्यासाठी पालकांची संमती घेण्यात आली होती का? इतक्या लांबच्या मदरशांमध्ये त्यांची रवानगी का करण्यात आली? या मागे काही आर्थिक व्यवहार तर नाही ना? याबाबत पोलिस तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संशयितास पोलीस कोठडी…

भुसावळ रेल्वेस्थानकावर मुलांसोबत असलेल्या मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सय्यद अली (वय ३४ रा. सांगली) याच्याविरुद्ध रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात कलम ३७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, ५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मनमाड रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. या चौघाना कोर्टाने 12 में पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सद्दाम हुसेन, नोमन सिद्दीकी, मोहंमद शहानवाज आणि एजाज सिद्दीकी अशी या चौघांची नावे आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई

दानापूर एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांना बालमजुरी करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती जळगाव येथील सामाजिक संस्थेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे एपीआय भाऊसाहेब मगरे, एएसआय प्रकाश थोरात, संतोष शेठे, अवधेश कुमार व अन्य कर्मचाऱ्यांनी दानापूर एक्स्प्रेसमध्ये मुलांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. या सर्व मुलांना प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उतरवण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : रेल्वे पोलिसांनी रोखली बालकांची तस्करी appeared first on पुढारी.