नाशिक लवकरच चित्रपट, मालिकांचे केंद्र होणार – अभिनेता चिन्मय उदगीरकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-पुण्यातच कलाकार तयार होतात, हा भ्रम आहे. आजघडीला मुंबई-पुण्याचे फिल्ममेकर चित्रीकरणासाठी नाशिकला प्राधान्य देतात. आज नाशिकमध्ये सात ते आठ सीरियलचे शूटिंग सुरू आहे. एका पाणी विषयावरील फिल्मचेही शूटिंग लवकरच सुरू करणार आहे. नाशिकमध्ये अनेक दिग्गज कलावंत तयार झाले असून, नाशिक लवकरच चित्रपट, मालिका यांचे केंद्र होणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले.

महर्षी चित्रपट संस्थेच्या सातव्या महर्षी लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवामध्ये एकूण ५२ लघुपट आले होते. त्यातील ३२ फिल्म स्क्रीनिंग करण्यात आले. त्यातील सात लघुपटांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी कल्याणच्या मिराग लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेला ‘पर्यावरण संवर्धन २०२३ पुरस्कार’ अभिनेता चिन्मय उदगीरकर व अभिनेत्री मयूरी कापडणे यांच्या हस्ते देण्यात आला. अभिनेत्री मयूरी कापडणे यांनी सांगितले की, माझ्याकडे कुठलाही अनुभव नव्हता, कुठल्याही नाटकात भूमिका केली नाही. कुठली पार्श्वभूमी नाही. फक्त आवड व जिद्दीच्या जोरावर इथपर्यंत आले. अजूनही संघर्ष चालू आहे, परंतु नाशिकमधून महर्षी चित्रपट संस्था लघुपटाच्या स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषिक देऊन पुढच्या वाटचालीचा पाया पक्का करत आहे. संस्थेमुळे इथल्या कलाकारांचे भविष्य उज्ज्वल आहे. सामाजिक कार्यकर्ते पंकज खताळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विक्रांत वैद्य यांनी सांगितले की, देवराई हा प्रकार फक्त कोकणातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही आहे. हा निसर्गठेवा चित्रीकरणाच्या माध्यमातून जगभर पोहोचवा.

यावेळी मिराग (प्रथम), चिरभोग (द्वितीय), होळी (तृतीय), वेशीवरच्या मुली, रद्दी, बकरू आणि घन (उत्तेजनार्थ) या लघुपटांना पारितोषिक देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी प्रास्ताविक केले. मोहिनी भगरे व किरण काळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजय कापडणीस यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, संजय करंजकर, राजू देसले, राजू शिरसाठ, गणेश बर्वे, डॉ. धर्माजी बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सोमनाथ मुठाळ, दिनकर पांडे, ॲड. अमोल घुगे, योगेश बर्वे, चंद्रकिरण सोनवणे, नीलिमा साठे, विजया तांबट, श्वेता कानडे, वैशाली मलिक, आर्या पगारे, साक्षी पगारे यांनी परिश्रम घेतले.


चित्रपट प्रशिक्षण संस्थेसाठी सहकार्य करेन : उदगीरकर

महर्षी चित्रपट संस्थेने आयटीआयसारखी प्रशिक्षण संस्था उभारून चित्रपटाशी निगडित स्पॉटबॉयपासून तांत्रिक सर्व बाबींचे प्रशिक्षण देऊन कलाकार तयार करावेत. मी सर्वतोपरी सहकार्य करेन. पाण्याची भूजल पातळी 70 टक्के खाली गेली आहे आणि तो चिंतेचा विषय आहे. चित्रपटाच्या माध्यमातून हा चिंतेचा विषय मांडला गेला पाहिजे, असे अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

 

The post नाशिक लवकरच चित्रपट, मालिकांचे केंद्र होणार - अभिनेता चिन्मय उदगीरकर appeared first on पुढारी.