नाशिक : लाच मागणाऱ्या प्रांतधिकाऱ्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : खासगी कंपनीची जमीन एनए करण्याच्या मोबदल्यात ४० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत निलेश अपार (३७, रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामगृह, दिंडोरी) असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मुंबई येथे दाखल तक्रारीनुसार, त्यांची दिंडोरी येथे कंपनी आहे. या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रांत अपार यांनी कंपनीस नोटीस बजावली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितले होते. कंपनीवर कारवाई न करण्यासाठी, तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदाराकडे प्रांत अपार यांनी ५० लाखांची मागणी केली. तडजोडी अंती ४० लाख रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी प्रांत अपार यांनी दर्शविली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. दरम्यान, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास अपार सावध झाले. त्यांना कारवाईची भनक लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दिंडोरी पोलिसात प्रांत अपार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे, डोंगरे, इंगळे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : लाच मागणाऱ्या प्रांतधिकाऱ्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.