नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव बसस्थानकासमोरील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मागील बाजूचे शटर तोडून चोरट्यांनी रोकडसह सुमारे 18 ते 20 लाख रुपयांचे महागडे मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय आदिनाथ कोठुळे, पो. कॉ. कैलास महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. लासलगाव बसस्थानकासमोर सामाजिक कार्यकर्ते मयूर वाघचौरे यांचे श्री समर्थ कृपा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सकाळी दुकान उघडले तेव्हा दुकानातील महागाडे मोबाइल फोन गायब असल्याचे दिसले. दुकानामध्ये फर्निचरसाठी मागील बाजूला एक छोटे शटर बसवले असून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी शटर वाकवून मध्यरात्री 1 च्या सुमारास चोरी केली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. मात्र सीसीटीव्हीचे डीव्हीआरही चोरट्यांनी चोरून नेले. शेजारच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे दुचाकीवरून गोणीमध्ये महागडे मोबाइल फोन चोरून नेत असल्याचे कैद झाले आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास appeared first on पुढारी.