नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर

प्रगणना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावली होती. नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांमध्ये विक्रमी पाऊस झाल्याने अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रांमध्ये गवताचे पीक जोमाने बहरले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक वनवृत्तातील व्याघ्र तसेच इतर वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर टाकण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. राज्यात इतरत्र 1 नोव्हेंबरपासून प्रगणना सुरू झाली असली तरी, नाशिक वनवृत्तात प्रगणेनला पुढील वर्ष उजाडणार आहे. दर चार वर्षांनंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण अर्थात एनटीसीएकडून व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलातील प्राणी गणना केली जाते. राज्यातील व्याघ्रसंवर्धन प्रकल्प, अभयारण्य तसेच संचार प्रकल्पात मांसभक्षी आणि तृणभक्षक प्राण्यांची गणना होते. ट्रान्झेक्ट पद्धतीने होणारी ही गणना विविध टप्प्यांत होईल. त्यामुळे संपूर्ण देशातील वाघांसह इतरही प्राण्यांची नेमकी संख्या उपलब्ध होऊन त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे शक्य होते.

सहा दिवस चालणार्‍या वन्यप्राणी गणनेत

सहा दिवस मांसभक्षक प्राणी गणना

सहा दिवस तृणभक्षक प्राणी नोंदी

मागील प्रगणना 2018 मध्ये… डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यांत प्रगणना करण्याचे नियोजन होते. ताडोबा अभयारण्यातील कोलारा परिक्षेत्रात भारतीय व्याघ्र तसेच इतर वन्यप्राणी प्रगणनेची पूर्वतयारी करीत असताना माया नावाच्या वाघिणीने महिला वनकर्मचार्‍यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या प्रगणनेला वनकर्मचार्‍यांकडून विरोध झाला. अखेर संरक्षण साहित्य पुरविल्यानंतर जानेवारी- 2022 मध्ये वन्यप्राणी प्रगणना झाली होती. मात्र, या प्रगणनेत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर यंदा पुन्हा प्रगणना करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

अशी होणार प्रगणना… सहा दिवस चालणार्‍या वन्यप्राणी गणनेत पहिले तीन दिवस मांसभक्षक प्राणी गणना व प्राणीचमण मार्गावर फिरणे तसेच उर्वरित तीन दिवस तृणभक्षक प्राणी नोंदीसाठी दोन ते तीन किलोमीटरच्या ट्रान्झिटवर फिरावे लागणार आहे. यात वन्यप्राण्यांच्या पायांचे ठसे, झालेल्या शिकारीचा प्रकार तसेच विष्ठा याचा अभ्यास करून आकडेवारी संकलित केली जाईल. यानंतर सर्व माहिती ‘एनटीसीए’कडे पाठविण्यात येणार आहे.

जानेवारीत प्रगणना शक्य… प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जागांवर ‘कॅमेरे ट्रॅपिंग’ लावून गणनेचे काम होणार असून, त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रगणनेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नाशिक वनवृत्तात प्रगणनेची पूर्वतयारी सुरू झाली असून, जानेवारी 2023 मध्ये प्रगणना होण्याची शक्यता वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी वर्तविली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक वनवृत्तातील वन्यप्राणी प्रगणना लांबणीवर appeared first on पुढारी.