विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर द्या : छगन भुजबळ

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राजकारणात काम करत असताना सोशल मीडिया हे माध्यम तितकेच महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. पक्षाची विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व पक्षवाढीसाठी या माध्यमाचा सदुपयोग करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया शिबिराचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की, पूर्वी संदेश पाठवण्यासाठी किंवा अगदी आवश्यक कामांसाठीही प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा वापर केला जात होता. आज मात्र आपण सातासमुद्रापलीकडील व्यक्तीशीही सेकंदाचाही विलंब न करता संपर्क साधू शकतो. त्याला पाहू शकतो हे सोशल मीडियामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे आधुनिक जगतातील संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम अर्थातच सोशल मीडियाच आहे. निवडणुकांमध्ये सोशल मीडिया हे अधिक प्रभावी माध्यम ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा सोशल मीडिया केडर निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही कार्यशाळा अतिशय महत्त्वाची आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता आहे. देशातील महापुरुष, पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्या विरोधात कुणी चुकीचा संदेश पसरवित असेल, तर त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले गेले पाहिजे. पक्षाची ध्येय धोरणे, विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष गोरख बोडके, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नाना महाले, माजी आमदार जयवंत जाधव, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, सोशल मीडिया तज्ज्ञ पराग पाटील, सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे, प्रदेश समन्वयक डॉ.कपिल झोटिंग, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर द्या : छगन भुजबळ appeared first on पुढारी.