नाशिक : नमामि गोदा २७८० कोटींवर!

गोदावरी नदी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी साकारण्यात येणाऱ्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा प्रारूप आराखडा सल्लागार संस्थेमार्फत आयुक्तांना सादर झाला असून, तीन वर्षांपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली असताना या प्रकल्पाचा खर्च आता २७८० कोटींवर गेला आहे. आता या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार असून, त्यात भागधारकांच्याही सूचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे.

२०२७-२८ मध्ये नाशकात सिंहस्थ कंभुमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील नमामि गंगेच्या धर्तीवर नाशकात नमामि गोदा प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट सुरू झाली. त्यात आयुक्तांच्या बदलीनंतर महापालिकेत संगीत खुर्चीचा खेळ रंगला. पाठोपाठ सल्लागार नियुक्तीची प्रक्रियाही लांबली. यामुळे नमामि गोदा प्रकल्प थंड बस्त्यात गेला होता. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीला चालना दिली. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियेद्वारे अलमोन्डस‌् नांगिया अॅण्ड कंपनी या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली. विद्यमान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. अखेर सल्लागार संस्थेने या प्रकल्पाचा प्रारूप आराखडा आयुक्तांना सादर केला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा खर्च २७८० कोटींवर गेला आहे.

असा आहे प्रकल्प…

महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, अडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाइनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा समावेश आहे.

असा होणार खर्च…

* केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार विद्यमान मलनिस्सारण केंद्रांचे अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे- ३९८.१८ कोटी.

* जुन्या मलवाहिका बदलून नवीन अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकणे व नव्याने विकसित झालेल्या भागात मलवाहिकांचे जाळे तयार करणे- ९२७.३४ कोटी.

* नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी- ६२२.०९ कोटी.

* नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३ कोटी.

खर्च तीन हजार कोटींवर जाणार

प्राथमिक प्रस्तावात नमामि गोदा प्रकल्पावर १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. प्रारूप आराखडा मात्र २७८० कोटींवर गेला आहे. अंतिम आराखडा तयार करताना त्यात आणखी बदल होऊन या प्रकल्पाचा खर्च तीन हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी अनुदान स्वरूपात दिला जाईल का हा प्रश्न आहे.

नमामि गोदा प्रकल्पाचा प्रारूप प्रकल्प आराखडा सल्लागार संस्थेमार्फत महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. भागधारकांची बैठक घेऊन त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर तो शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

– उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : नमामि गोदा २७८० कोटींवर! appeared first on पुढारी.