नाशिक : वाघ यांच्या पक्षांतरावर आ. कोकाटे यांचा टोला

सिन्नर www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
प्रत्येकवेळी ब्लॅकमेल करायचे आणि वेडेवाकडे निर्णय घ्यायचे हा बाळासाहेब वाघ यांचा धंदाच आहे. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. आता कोणाच्या मनात कसलाही संशय राहीलेला नाही, अशी खोचक प्रतिक्रिया आमदार कोकाटे यांनी दिली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या पक्षांतरानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब वाघ यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सभापती ते राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष हा राजकीय प्रवास मी दाखवलेला आहे. त्यांनी दुटप्पी राजकारण केले. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभेच्छा आहेत. चापडगाव ग्रामपंचायतचे सदस्य संदीप सांगळे व बाजार समिती माजी संचालकजगन्नाथ खैरनार यांनी आमदार कोकाटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कारवाईचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा न देता वाघ यांनी वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी येत्या दोन दिवसांत राजीनामा दिला नाही, तर त्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा आमदार माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी दिला.

‘दुटप्पी राजकारणाचे माझ्याकडे पुरावे’
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत चेअरमन निवडीसंदर्भाने माझ्याशी चर्चा करण्याऐवजी वाघ यांनी संचालकांना परस्पर फोन केले. विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या दुटप्पी राजकारणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. ते पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडत होते, असेही आमदार कोकाटे यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी उपाशीपोटी काम केले. एकटे बाळासाहेब उपाशीपोटी काम करत नव्हते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा:

The post नाशिक : वाघ यांच्या पक्षांतरावर आ. कोकाटे यांचा टोला appeared first on पुढारी.